महाराष्ट्रातल्या २८८ जागांसाठीचं मतदान आज पार पडलं आहे. १४५ ही मॅजिक फिगर महायुती गाठणार हे जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनी स्पष्ट केलं आहे. १४५ ही मॅजिक फिगर आहे एकाही एक्झिट पोलने महायुतीला १७५ पेक्षा कमी जागा दिलेल्या नाहीत. याचाच अर्थ हा की महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचंच सरकार येणार हे चित्र एक्झिट पोल्सनी स्पष्ट केलं आहे. आता महत्त्वाचा भाग आहेत तो मुंबईत काय घडणार त्याचा? मुंबईत ३३ जागांसाठी मतदान झालं आहे. या जागांमध्ये भाजपाला १७ तर शिवसेनेला १६ जागा मिळतील असा अंदाज न्यूज १८ ने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे.

या पोलचा विचार करता मुंबईतही भाजपाच मोठा भाऊ असं दिसून येतं आहे. राज्यातही भाजपाच मोठा भाऊ ठरणार हे चित्र जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनही स्पष्ट केलं आहे. लोकसभेप्रमाणेच भाजपाची विधानसभा निवडणुकीतही मोठी मुसंडी पाहण्यास मिळेल यात काहीही शंका नाही. लोकसभेत एकट्या भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२० जागा महायुतीला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. आता निकालाच्या दिवशी नेमक्या भाजपाला किती जागा मिळणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

बाळासाहेब ठाकरे हयात असताना जेव्हा युती झाली तेव्हा केंद्रात भाजपा मोठा भाऊ आणि राज्यात शिवसेना मोठा भाऊ असं चित्र होतं. आता मात्र आमचं ठरलंय, सगळं समसमान होईल, होय आमचाच मुख्यमंत्री, आमचा पक्षच पितृपक्ष हे सांगणाऱ्या शिवसेनेला लहान भावाच्या भूमिकेत जावं लागलं आहे हे निश्चित आहे. निवडणुकीच्या आधी युतीची घोषणा करण्यासाठी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेतही त्यांना लहान भाऊ कोण मोठा भाऊ कोण हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं होतं की लहान कोण मोठा कोण हे सोडून द्या भावांचं नातं टिकलं आहे ही बाब जास्त महत्त्वाची आहे. यावरुनच शिवसेना लहान भावाच्या भूमिकेत गेली हे अधोरेखित झालं. आता एक्झिट पोलचे अंदाजही हेच सांगत आहेत. प्रत्यक्षात काय घडणार ते पाहणं गुरुवारी रंजक ठरणार आहे.