धवल कुलकर्णी 

1997 दरम्यानची घटना. तेव्हा शिवसेनेमध्ये असलेले राज ठाकरे यांच्या मनात विचार घोळत होता, तो म्हणजे बॅडमिंटन खेळायला शिकणे. दादरला राज व यांचे मित्र बॅडमिंटन खेळू लागले. एकदा राजला वाटलं की आपण दादूला म्हणजेच आपले मोठे चुलत बंधू उद्धव ठाकरे यांनाही खेळायला बोलवावं. मग काय, राज-उद्धव व त्यांच्या मित्रांचा गोतावळा बॅडमिंटन खेळू लागला.

एकदा बॅडमिंटन खेळताना उद्धव ठाकरे यांचा तोल गेला व ते पडले. राजचे मित्र हसले, स्वतः राज पण हसले. त्यावेळेला उद्धव काहीच बोलले नाही. पण, दुसऱ्या दिवसापासून बॅडमिंटन खेळायला येणं मात्र बंद झाला. उद्धव तेवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी बांद्रा येथे एक बॅडमिंटन कोर्ट बुक केला. एक उत्कृष्ट कोच घेतला. ते आज अत्यंत उत्कृष्ट बॅडमिंटन खेळतात.

उद्धव ठाकरेंबाबतचा फारसा जुना नसलेला हा किस्सा त्यांची जिद्द, चिकाटी व मेहनत घेण्याच्या स्वभावाबद्दल बरंच काही सांगून जातो. कदाचित त्यामुळेच शिवसेनेची नौका त्यांनी अनेक वादळांमधून सुखरूपपणे नेत सत्ताधारी पक्षाच्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत जाऊन पोचले आहेत.

राज आणि उद्धव यांचं नातं तसं दोन्ही बाजूने. म्हणजे बाळासाहेब ठाकरे व श्रीकांत ठाकरे हे दोघे सख्खे भाऊ, तसेच मीनाताई व कुंदाताई ठाकरे या सख्या बहिणी. बाळासाहेबांचा सर्वात मोठा चिरंजीव बिंदुमाधव उर्फ बिंदा. दुसरा जयदेव उर्फ टिब्बा आणि शेंडेफळ म्हणजे 1960 मध्ये जन्माला आलेला उद्धव अर्थात डिंगा. हे टोपण नाव त्यांना दिले ते त्यांच्या संगीतकार काकांनी म्हणजे श्रीकांत ठाकरे नी. हे तिघे भाऊ मात्र आपल्या वडिलांना म्हणजेच बाळासाहेबांना पिळगा असं म्हणत.

बाळासाहेब व राज या काका-पुतण्यांचे सख्य जरी आज महाराष्ट्राला माहीत असलं, तरी फार कमी लोकांना हे ठाऊक असेल की श्रीकांत-उद्धव हेसुद्धा एकमेकांना जवळ होते. उद्धव साधारणपणे एक दीड वर्षाचे असताना प्रचंड आजारी पडले होते. तब्येत खूप बिघडली होती. इतकी, की बाळासाहेबांनी उद्विग्न होऊन घरातला देवारा फोडून टाकला होता. पण श्रीकांत ठाकरे व त्यांच्या एका बहिणीने लहानग्या उद्धवला इस्पितळात नेले. श्रीकांत यांनी उद्धवची शुश्रूषा केली व तो बरा झाला. त्यानंतर या काका-पुतण्याची गट्टी खऱ्या अर्थाने जमली.

बाळासाहेब व श्रीकांत हे दोघं उत्कृष्ट व्यंगचित्रकार. त्याच्यामुळे 1960 मध्ये आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी त्यांनी सुरू केलेले मार्मिक हे साप्ताहिक व्यंगचित्राला वाहिलेले होते. पुढे याच साप्ताहिकातून शिवसेनेचा जन्म झाला. बाळासाहेब हे कदाचित एकमेव व्यंगचित्रकार असतील ज्यांच्या कुंचल्यातून एक राजकीय पक्ष जन्माला आला.

राज उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहे, हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण उद्धवसुद्धा काही काळ मार्मिकसाठी व्यंगचित्र काढत होते. अर्थात नंतर त्यांना छंद जडला तो फोटोग्राफीचा. त्यांचे लाडके काका श्रीकांत यांनाही फोटोग्राफीची प्रचंड आवड होती. हा निव्वळ योगायोग नसावा.

आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाल्यानंतर शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर प्रचंड प्रमाणात फटाके फोडले जातील, हे वेगळे सांगायला नकोच. पण लहानपणी उद्धवजींना फटाके फोडण्याचा आवाज ऐकायला नको वाटायचं हे सांगितलं तर किती जणांना विश्वास बसेल? बालवयात उद्धव खूप शांत होते. इतके की त्यांच्या आत्या संजीवनी करंदीकर त्यांना श्रावणबाळ म्हणत. त्यात लक्षणीय गोष्ट अशी की भावंडांमध्ये उद्धव हे सगळ्यात लहान. उद्धवपेक्षा आठ वर्षांनी लहान असलेले राज हे प्रचंड मस्तीखोर होते. पण, उद्धव मात्र शांत. ही ठाकरे भावंड दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात शिकलेली. इथे राज आणि उद्धव दोघेही खूप शांत होते. उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असं सांगतात की, ते पार क्वचितच आपला तोल जाऊ देतात. त्यांनी चिडणं म्हणजे प्रचंड अप्रूप, जवळजवळ नसल्यात जमा. कदाचित याच अंगीभूत गुणामुळे त्यांना वाईल्डलाईफ फोटोग्राफी सहजपणे करता आली असावी.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, ही उक्ती सिद्ध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ह्या आधीच्या रश्मी पाटणकर. त्यांचं आणि उद्धव ठाकरे यांचं लग्न जुळवण्यामागे राज ठाकरे यांच्या मोठ्या भगिनी जयवंती यांचा हात होता. जयवंती आणि रश्मी या मैत्रिणी.

खरतर शिवसेना म्हणजे प्रचंड आक्रमक संघटना, जणू गुरगुरणारा वाघच. उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवेश तसा खलबतखानातून झाला. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब हे सध्या त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या शिवसेनेत दिसते. त्यांच्याच प्रभावामुळे असेल, कुठेतरी शिवसेनेची मूस आज बदलताना दिसते.

मुंबईतल्या प्रख्यात सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट या संस्थेतून बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (अप्लाइड आर्ट) ही पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उद्धव ठाकरेंनी नंतर आपल्या काही मित्रांसोबत चौरंग नावाची एक जाहिरात संस्था सुरू केली.

1985 मध्ये शिवसेना मुंबई महापालिकेमध्ये सत्तेवर आली त्यावेळी शिवसेनेच्या कॅम्पेन जाहिरातींमध्ये उद्धव ठाकरे यांचे सुद्धा मोठे योगदान होते. 1988 ला राज ठाकरेंनी भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद स्वीकारले व आपल्या राजकीय जीवनाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा केला. त्याच्यानंतर बरोबर दोनच वर्षांनी म्हणजे 1990 झाली उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन शिवसेना शाखाप्रमुख व नंतर शिवसेनेचे व मनसेचे आमदार झालेले शिंदे यांच्या मुलुंड येथील शाखेच्या कार्यक्रमात उपस्थित राहून राजकारणात प्रवेश केला. या दोन तारखा फार महत्त्वाच्या आहेत. राजच्या राजकारणातल्या प्रवेशानंतर लगेचच उद्धव ठाकरेंचं सक्रिय होणं हा निव्वळ योगायोग नव्हता.

डिसेंबर 1991 पासून राज ठाकरेंनी जवळजवळ दोन महिने महाराष्ट्र पिंजून काढला तो राज्यातल्या 27 लाख बेरोजगार तरुणांच्या प्रश्नावर. या आंदोलनाचा शेवट नागपूरला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून होणार होता. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय सांगतात की, त्याच्या आदल्या रात्री नागपूरच्या हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये राहिलेल्या राजला असं सांगण्यात आलं की, उद्या तुझ्या कार्यक्रमात दादूला म्हणजेच उद्धवला भाषण करू दे. तसं झालं सुद्धा. त्यापूर्वी सुद्धा छोट्या-मोठ्या कुरबुरी होत्या पण इथूनच दोघांमध्ये ठिणगी पडली, असं या निकटवर्तीयांचा दावा आहे. या मतभेदांचं रूपांतर पुढे काय झालं हे महाराष्ट्राला माहीत आहेच.

स्वभावाने काहीसे इंट्रोव्हर्ट असलेल्या उद्धव ठाकरेंचं मित्रवर्तुळ चुलत बंधू राजच्या मानाने लहान. त्या मित्रांपैकी एक आहेत सिनेस्टार मिलिंद गुणाजी. मुळात निर्व्यसनी असलेल्या उद्धवना दारूची चवसुद्धा सहन होत नसल्याची आठवण त्यांना ओळखणारे सांगतात. एकेकाळी राज व उद्धव या दोघांचा एका माजी क्रिकेटपटूने सुरू केलेल्या स्पोर्टस गुड्स इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीमध्ये काही हिस्सा होता.

बाळासाहेब हे बोलायला प्रचंड तडक-फडक. ओठात आणि पोटात काही वेगळे नाही. उद्धव हे जरी जेंटलमन म्हणून ओळखले जात असले, तरी अनेकदा काही गोष्टी न बोलून दाखवतासुद्धा अनेक गोष्टी साध्य करतात.

तर असे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. ज्यांना आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेसला घेऊन एक तारेवरची कसरत करायची आहे…

(धवल कुलकर्णी हे पत्रकार व ‘The Cousins Thackeray: Uddhav, Raj and the Shadow of their Senas’ व ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकांचे लेखक आहेत)