राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सकाळी अचानक झालेल्या या शपथविधीनंतर राज्यात मोठा राजकीय भुकंप झाला. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार केला जाईल या भितीमुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना फुटू नये म्हणून काळजी घेतली आहे. त्यामुळे रात्रीही अनेक बडे नेते या आमदारांची भेट घेताना दिसत आहे. असंच काहीसं घडलं मध्यरात्री एकच्या सुमारास जेव्हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आमदारांच्या बैठक संपवून सिलव्हर ओक या निवासस्थानी निघाले.

महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व १६२ आमदार सोमवारी संध्याकाळी ग्रँड हयात या हॉटेलमध्ये जमले होते. ‘वी आर १६२’ असं या बैठकीला नाव देण्यात आलं होतं. या बैठकीनंतर रात्री उशीरा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाड्यांचा ताफा वाळकेश्वर येथील पावरांच्या ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी निघाला. पवारांच्या गाडीमध्ये सुप्रिया या पुढे चालकाच्या बाजूच्या सीटवर बसल्या होत्या तर पवार मागील सीटवर बसले होते. यावेळी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरांनी पवारांच्या गाडीमध्ये त्यांच्या बाजूला एक व्यक्ती बसल्याचे दृष्य टीपले. मात्र बाहेर प्रासरामाध्यांच्या प्रतिनिधींना बघून या व्यक्तीने स्वत:चा चेहरा लपवला. त्यामुळे ही व्यक्ती कोण असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. विरोधीपक्षातील एखादा मोठा नेता पवारांच्या संपर्कात आहे का?, ही व्यक्ती कोण आहे?, तीने चेहरा का लपवला?, भाजपाचा एखादा बंडखोर नेता राष्ट्रवादीला साथ देणार का? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आले आहेत. असं असलं तरी ही व्यक्ती कोण आहे याबद्दलची माहिती मिळालेली नाही.

मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये बैठक पार पडली. खास बाब म्हणजे याच हॉटेलमध्ये सोमवारी रात्री शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती. येथे या दोन्ही नेत्यांनी नक्की कोणाची भेट घेतली. पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघालेल्या गाडीमधील ती व्यक्ती कोण होती असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत.