राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, राज्यात आमदारांच्या घोडेबाजाराच्या शक्यताही चर्चिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारांना फोडणाऱ्यांना कडक इशारा देताना वादग्रस्त विधान केले आहे. शिवसेनेच्या आमदारांना फोडणाऱ्यांचे आम्ही डोकं फोडू असे विधान त्यांनी केले आहे.

सत्तार म्हणाले, जर कोणी शिवसेनेच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचं डोकं फोडू त्याचबरोबर त्याचे पायही तोडून टाकू. यानंतर त्याची दवाखान्याची व्यवस्था आणि रुग्णावाहिका देखील शिवसेनाच उपलब्ध करुन देईल.

ही जी फोडाफोडीच्या राजकारणाची सध्या चर्चा सुरु आहे ती घटनेविरोधी आहे. ज्या पक्षाचे आमदार निवडून आले आहेत त्यांचेच राज्यात सरकार बनेल. त्यामुळे लोकांमध्ये जे नवनव्या पुड्या सोडण्याचे काम काही भाजपाचे नेते करीत आहेत, त्यांच्यासाठी हा इशारा आहे.