राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. कारण, येत्या आठवड्याभरात सत्तास्थापन होईल असा दावा शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असेही त्यांनी ठामपणे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी पार पडेल, असे सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांची २२ नोव्हेंबर रोजी बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीला येताना सर्वांना आपली ओळखपत्रं आणि पाच दिवसांसाठीचे कपडे घेऊन येण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या बैठकीनंतर पुढील दोन-तीन दिवस आम्हा शिवसेनेच्या सर्व आमदारांना एकाच ठिकाणी रहावे लागण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील पावलं काय टाकायची हे निश्चित होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निश्चितपणे उद्धव ठाकरेंचीच निवड होईल असा दावाही सत्तार यांनी केला आहे.