अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीनेच देशाची अर्थव्यवस्था ठीक नसल्याचे म्हटले आहे. त्यांचा हा सल्ला तरी त्या ऐकतील का? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला आहे.

अकलूजमध्ये माळशिरस मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत राज्यातील आर्थिक संकटाबाबत चिंता व्यक्त करताना पवार बोलत होते. ते म्हणाले, खुद्द अर्थमंत्र्यांचे पतीच जर असे सांगतात तर सरकार यावर गंभीरपणे विचार करणार का? अर्थमंत्री हा सल्ला ऐकणार का? हा प्रश्न आहे.

अर्थमंत्री सीतारमन यांचे पतीच म्हणतात, देशाची अर्थव्यवस्था ठीक नाही

देशात मंदीचे परिणाम दिसत असताना अनेकांनी याबाबत भाष्य केलेले असतानाही केंद्र सरकार ते मान्य करायला तयार नाही. आता तर अर्थमंत्री सितारामन यांच्या पतीने काल एक पत्रक काढून सांगितले की, देशातील आर्थिक मंदी घालवण्यासाठी, कारखानदारी टिकवण्यासाठी आजचे आर्थिक धोरण चालणार नाही. खुद्द अर्थमंत्र्यांच्या पतीनेच निदर्शनास आणून दिलेल्या या बाबींवर तरी सरकारने गांभिर्याने विचार करायला हवा. अर्थमंत्र्यांनी आपल्या पतीचा सल्ला तरी ऐकावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत राहण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पी. व्ही. नरसिंह राव या काँग्रेस नेत्यांनी जे निर्णय घेतले ते निर्णय आता घेण्याची आज गरज असल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.