घाटकोपर पूर्वमधून भाजपाचे उमेदवार असलेले परगा शाह महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. पराग शाह यांची एकूण संपत्ती संपत्ती ५०० कोटी रुपये आहे. पराग शाह यांनी बी.कॉममधून पदवी घेतली आहे. मुंबईसह गुजरात आणि चेन्नईमध्ये त्यांचा व्यावसाय आहे. पराग शाह हे नाव दोन वर्षापूर्वी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी चर्चेत आलं होतं.

५० वर्षीय पराग शाह यांनी २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवली होती. त्यावेळी संपत्तीमुळे देशभरात त्यांचं नाव चर्चेत होते. त्यांची संपत्ती तब्बल ६९० कोटी रुपयांची होती आणि नगरसेवकाची निवडणूक लढवणारे ते सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले होते. त्या तुलनेत शाह यांच्या संपत्तीत घट झाल्याचे समोर आले. पराग शाह यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना मागे टाकले आहे. लोढा यांची एकूण संपत्ती ४४१ कोटी रूपये आहे. विशेष म्हणजे मंगलप्रभात लोढा हे मागील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले होते.

२०१७ च्या तुलनेत पराग शाह यांच्या संपत्तीत घट झाली आहे. पराग शाह यांच्याकडे फरारी गाडी आहे. पण ती गाडी ते स्वत: वापरत नाहीत. ती गाडी त्यांची पत्नी वापरते आणि शहा हे स्कोडा गाडीतून फिरतात, असे प्रतिज्ञा पत्रात नमूद करण्यात आले आहे. आपण पेशाने व्यावसायिक असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

शाह समर्थक आणि मेहता समर्थक एकमेकांना भिडले.

विधानसभा निवडणुकीसाठी घाटकोपर पूर्व मतदारसंघामधून विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाह यांना भाजपाने तिकीट दिले. पराग शाह हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी त्यांची अडवणूक केली. शाह यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांच्या गाडीच्या काचा फोडला. अर्ज भरायला जाण्याआधी शाह हे मेहता यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले असता हा हल्ला झाला.