राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विरोधीपक्ष नेते आमदार धनंजय मुंडे यांनी अखेर आपण पक्षाबरोबर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे.

”मी पक्षाबरोबर आहे, मी शरद पवार यांच्याबरोबर आहे. कृपया अफवा पसरवू नका.” असे ट्विट करून, त्यांनी सध्या सुरू असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दिवसभर धनंजय मुंडे हे कोणाच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. अखेर सायंकाळी उशीरा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस हजेरी लावली होती. मात्र तरी देखील धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या संपर्कात आहेत, अशाच चर्चा सुरू होत्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील धनंजय मुंडे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली होती.

शिवसेनेच्या गोटातून त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त केली जात असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर धनंजय मुंडे यांनी आपण पक्षाबरोबर व शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.