शहरासह जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक कामकाजात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे आहेत. निवडणुकीसाठी १४ हजार ३९६ महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यंदा निवडणूक कामकाजात महिलांची संख्या लक्षणीय आहे.

शहरासह जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी विविध कक्ष स्थापन केले आहेत. २१ मतदारसंघांत सात हजार ९१५ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून ४० लाख ४२ हजार ८९ पुरुष आणि ३६ लाख ८६ हजार ८८५ महिला मतदार आहेत. निवडणूक कामकाजात उप जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मृणालिनी सावंत, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्यामल पाटील पोवार आणि योगिता बोडके यांच्याकडे आहे. विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त नयना बोंदार्डे, साधना सावरकर, स्नेहल बर्गे, रूपाली आवले, तहसीलदार मनीषा देशपांडे, मीनल भामरे, नायब तहसीलदार अपर्णा तांबोळी या पुणे विभागाचे निवडणूक विषयक काम पाहत आहेत. निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्याचे काम ज्योत्स्ना पडियार, वनश्री लाबशेटवार यांच्याकडे आहे. आचारसंहिता राबवण्यासाठी आवश्यक कामकाज सुरेखा माने यांच्याकडे, मतदार जनजागृती व्यवस्थापन आशाराणी पाटील करत आहेत. विविध बैठकांचे नियोजन गीतांजली शिर्के यांच्याकडे आहे. मतदार मदत कक्ष नियंत्रण जबाबदारी वर्षां पवार यांच्याकडे आहेत. मतदान साहित्य पुरवण्याची जबाबदारी शिल्पा करमरकर यांच्याकडे आहे, अशी माहिती सहायक माहिती संचालक वृषाली पाटील यांनी दिली.

अनेकविध खाती महिला अधिकाऱ्यांकडे

पद्मश्री तळदेकर या खर्च व्यवस्थापन निरीक्षकांच्या समन्वयक आहेत. वर्षां सहाणे, अनघा पुराणिक आणि नलिनी सुत्रावे यांच्याकडे मतदान केंद्रस्थळी सुविधा पुरवणे आणि तात्पुरते मतदान केंद्र स्थापन करणे, विद्युत पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. अपंग मतदारांसाठी रोहिणी मोरे उपक्रम राबवत आहेत. संगणकीकरण व्यवस्थापनाची जबाबदारी अश्विनी करमरकर यांच्याकडे, वाहतूक आराखडा यामिनी जोशी यांच्याकडे, विधी कक्षाद्वारे कायदेविषयक जबाबदारी स्वाती पंडित यांच्याकडे आहे. एक खिडकी योजनेची माहिती सुनीता आसवले पाहत आहेत. माध्यम कक्ष वृषाली पाटील, शैलजा तारू पाहत आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी

  • विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आरती भोसले, मनीषा कुंभार, वैशाली इंदाणी, रेश्मा माळी, अस्मिता मोरे, नीता सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मतमोजणी व्यवस्थापन नंदिनी आवाडे यांच्याकडे आहे.