News Flash

तुम्ही होणार एका नव्या परळीचे साक्षीदार : धनंजय मुंडे

लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केल्याबद्दल मतदारांचे मानले आभार

संग्रहित छायाचित्र

राज्यभरातील विधासभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर, सोमवारी सर्वत्र मतदान देखील पार पडले आहे. आता उमेदवारांसह पक्षांना व मतदारांना देखील वेध लागले आहेत ते निवडणुकीच्या निकालाचे. काही उमेदवारांसह त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून निकालाअगोदरच आपला विजयी झाल्याचे बॅनर लावण्यात आल्याचे दिसत आहे. काहींनी तर आगामी मंत्रिमंडळात आपले स्थान निश्चित असल्याचेही आताच सांगून ठेवले आहे. हे पाहता मतदारांची निकालाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर परळी मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील परळीकरांना तुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार असल्याचे म्हणत, एकप्रकारे आपल्या विजयाची खात्री दर्शवली आहे.

राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या लढतीतील एक असेलल्या परळी मतदार संघातील लढतीच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण, बीड जिल्ह्यातील या चर्चेत असलेल्या मतदार संघात विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व भाजापाच्या मंत्री आमदार पंकजा मुंडे या बहिण-भावात थेट लढत झाली आहे. शिवाय, प्रचार कालावधीत शेवटच्या दिवसापर्यंत घडलेल्या घडमोडींनी व सभांमधील गाजलेल्या वक्तव्यांनी येथील निवडणूक अधिकच रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले.

या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळीकरांसाठी ट्विटरच्या माध्यामातून एक खास संदेश दिला आहे. ” लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्याबद्दल माझ्या तमाम परळीकरांचे आभार! तुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार आहात याची हमी मी तुम्हाला देतो!” असे धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. याद्वारे त्यांनी यंदाच्या निवडणुकीत आपलाच विजय निश्चित आहे, असाच एकप्रकारे संदेश दिला असल्याचे दिसत आहे. शिवाय मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारराजाचे त्यांनी आभारही मानले आहे.

कार्यकर्ते ज्यावेळी निवडणूक हातात घेतात तेव्हा त्या निवडणुकीत विजय हा निश्चित असतो. सकाळपासून परळीचा प्रत्येक कार्यकर्ता माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून फिरत आहे. आपुलकीने घास भरवत आहे. परळीतील प्रत्येक नागरिकाने भूक तहान विसरून काम केले आहे. आपल्या मेहनतीचे नक्कीच चीज होईल. असंही धनंजय मुंडे यांनी मतदानाच्या  दिवशी म्हटलं होतं.

पंकजा मुंडे यांनी देखील मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेस सुरूवात होण्याअगोदर एका ट्विटद्वारे विरोधकांना सूचक इशारा दिला होता. ” घने अंधकार को चीरते आसमान के तारे हैं, स्वयं जलकर हमनें औरोंके घर किये उजारे है, विजय हमारी हमारे ललाट पर लिखी है, वो क्या जंग लड़ेंगे हमसे जो खुद मन से हारे हैं ” असे ट्विट करत त्यांनी यंदा देखील आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 4:16 pm

Web Title: you will be witness to a new parali dhananjay munde msr 87
Next Stories
1 मतदान केंद्रावर मद्यधुंद अवस्थेत आढळलेला मुख्याध्यापक निलंबित
2 यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही: हितेंद्र ठाकूर
3 आगामी मंत्रिमंडळात मला निश्चित स्थान मिळणार : राम शिंदे
Just Now!
X