मुंबई दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याला येरवडा कारागृहात बुधवारी सकाळी साडेसात वाजता फासावर लटकविण्यात आले. ही माहिती समजताच नागरिकांनी येरवडा कारागृहाच्या समोर गर्दी करून पेढे, साखर वाटून भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देऊन जल्लोष केला.
कसाबच्या फाशीच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतीने फेटाळल्यानंतर त्याच्या फाशी देण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली. ही कारवाई पूर्व करण्यासाठी ऑपरेशन ‘एक्स’ तयार करण्यात आले होते. याबाबत कमालाची गुप्तता पाळण्यात आली होती. कसाबला सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक अथर्व रोड कारागृहातून रस्त्याने घेऊन आले. पहाटे साडेचारच्या सुमारास कसाबला येरवडा कारागृहात दाखल केले. या ठिकाणी त्याला अतिसुरक्षित अंडासेलमध्ये ठेवण्यात आले. फाशीच्या आगोदर दोन दिवस तो अंडासेल मध्ये होता. बुधवारी सकाळी साडेसात वाजता न्यायाधीश, येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी, कारागृहाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत फाशी देण्यात आली. त्यावेळी तीस कर्मचाऱ्याचे सुरक्षा पथक त्या ठिकाणी नेमण्यात आले होते. कसाबला फाशी देण्याच्या आगोदर त्याला शेवटी इछा विचारण्यात आल्यावर त्याने कोणतीही इच्छा नसल्याचे सांगितले. कसाबला घेऊन आलेले पथकातील अधिकाऱ्यांना कसाबला फाशी देऊन दफन करेपर्यंत कारागृहाच्या बाहेर सोडण्यात आले नाही.
कसाबला फाशी दिल्याची बातमी कळताच नागरिक व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी येरवडा कारागृहासमोर गर्दी केली होती. शिवसेना, अखिल भारतीय छावा संघटना व इतर काही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कारागृहासमोर एकच जल्लोष केला. या ठिकाणी साखर, पेढे वाटून, फटाकेही वाजवून आपला आनंद साजरा केला. नागरिकांनी वाढलेली गर्दी पाहून कारागृहासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. गर्दी वाढू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती.