गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आज स्थगित झाल्यानंतर त्यावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर हा दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावरून राज ठाकरेंना खोचक शब्दांत नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच, महाराष्ट्रातील नेत्यांचा आपल्या फायद्यासाठी भाजपा नेहमीच वापर करून घेत आली असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी यावेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरेंचं ट्वीट

राज ठाकरेंनी आज सकाळीच ट्वीट करून अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाल्याचं जाहीर केलं आहे. “तूर्तास अयोध्या दौरा स्थगित! महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलू” असं म्हणत २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेमध्ये यासंदर्भात भूमिका मांडणार असल्याचं राज ठाकरेंनी या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

“…तर राज ठाकरेंना मदत केली असती”

आम्हाला विचारलं असतं, तर राज ठाकरेंना मदत केली असती असं संजय राऊत म्हणाले आहेत. “आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते. त्यांनी ते रद्द केले. पण ५ जूनच्या कार्यक्रमासाठी त्यांना काही सहकार्य हवं असतं, तर ते आम्ही नक्कीच दिलं असतं. अयोध्या, उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे. अयोध्येच्या जनतेने, साधूसंतांनी, तिथल्या राजकारण्यांनी”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“भाजपाने त्यांच्या बाबतीत असं का करावं. हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळी भाजपा असा खेळ करतं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेतं. त्यातलाच हा प्रकार मला दिसतोय. यातून एक शहाणपण काही लोकांना आलं, तर बरं होईल. यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं, महाराष्ट्राचं होतं. आपण भाजपाच्या हातात वापरले जातोय हे काही लोकांना उशीरा समजतं. आम्ही हा विषय मर्यादित ठेवलाय. हे राजकारण आम्हाला करायचं नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी टोला लगावला.

शिक्कामोर्तब! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द; स्वत: ट्विट करत म्हणाले, “महाराष्ट्र सैनिकांनो…”

“काहींना तीर्थयात्रेला जायचं असतं, तेव्हा ते विचारतात काही मदत करू शकता का? शिवसेनेचं एक मदत कक्ष आहे. कुणाला दर्शनाला अडचणी येत असतील, तर आम्ही मदत करतो. तिथे आम्ही राजकारण बाजूला ठेवतो”, असं देखील राऊत म्हणाले.

“आदित्य ठाकरेंचा दौरा शक्तीप्रदर्शन नाही”

गेल्या काही दिवसांपासून तिथलं वातावरण खराब होतं. बृजभूषण सिंह यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा कार्यक्रम होत नाही. कदाचित लोकांच्या मनात रोष असावा. पण आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्येला जात आहेत. हा धार्मिक कार्यक्रम असून शक्तिप्रदर्शन वगैरे काही नाही, असं संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut shivsena mocks mns raj thackeray ayodhya visit cancelled pmw
First published on: 20-05-2022 at 10:35 IST