महाराष्ट्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानावरुन सध्या राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद निर्माण झाला आहे. अर्थात चंद्रकांत पाटलांनी या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र, त्यावरून विरोधकांनी आता सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटाकडूनही चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलं जात आहे. शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात ट्वीटरवरुन चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला. तसेच, चंद्रकांत पाटलांना त्यांना कोथरुड मतदारसंघावरुन टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी पैठण येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांसंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. “कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू केल्या. शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या वाक्यामधील भीक मागितली या शब्दांवर आक्षेप घेण्यात आला आणि त्यातूनच वादाला तोंड फुटलं.

याच वादामध्ये आता सुषमा अंधारेंनीही उडी घेतली आहे. “ज्यांच्याकडे मतदारसंघ सुद्धा स्वतःच्या हक्काचा नाही त्यांना दान, योगदान, दातृत्व, या शब्दांचा परिचय असण्याचे कारणच नाही. महाराष्ट्राला हिन लेखत, महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचा डाव आखणाऱ्या भाजपाला लोक चोख धडा शिकवतील,” असं ट्वीट सुषमा अंधारेंच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> “अमित शाहांचा फोन आला आणि ते म्हणाले, तुम्ही सांगताय ते…”; चंद्रकांत पाटलांनी सांगितला कोथरुडमधून तिकीट मिळाल्याचा किस्सा

दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाही. त्यांनी लोकांकडून पैसे मागितले. आपण वर्गणी मागितली, सीएसआर मागितला असं आज म्हणतो. त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील घरोघरी फिरून धान्यही मागायचे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक पुण्यातील कोथरुड मतदारसंघामधून का लढवली यासंदर्भातील सविस्तर माहिती ऑक्टोबर महिन्यात पुण्यामध्ये भाजपाच्यावतीने पालमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कारसमारंभाच्या वेळी दिली होती. हा मतदारसंघ माझ्यासाठी निवडण्यामागे दिल्लीतील नेतृत्वाचा हात होता असं पाटील यांनी म्हटलं होतं. कोल्हापूरऐवजी पाटील यांना कोथरुडमधून तिकीट देण्यावरुन बराच वाद निर्माण झाला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare slams chandrakant patil over his comment in pandharpur scsg
First published on: 10-12-2022 at 13:31 IST