महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ४१ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाउनच्या सुरुवातीपासून म्हणजेच दि.२२ मार्च ते २ जुलै या कालावधीत कलम १८८ नुसार १,४१,२५८ गुन्हे नोंद झाले असून २९,५५९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी १२ कोटी २५ लाख ११ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ४८ हजार ००५ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.

कडक कारवाई

करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २९२ घटना घडल्या. त्यात ८६१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाउनच्या काळात या फोनवर १,०५,५७७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७८३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८६,६६३ वाहने जप्त करण्यात आली.
पोलीस करोना कक्ष
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने मुंबईतील ३८ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३९, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,नाशिक शहर १, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे ३, ठाणे शहर ३ व ठाणे ग्रामीण १ व १ अधिकारी,
जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना SRPF अधिकारी १, उस्मानाबाद १ अशा ६२ पोलीस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १२३ पोलीस अधिकारी व ९१४ पोलीस करोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सोशल डिस्टेन्सिंग पाळा
करोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.