MNS Chief Raj Thackeray on Ashok Kharat Controversy: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात याचे नवनवे प्रताप बाहेर येत आहेत. आधी त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी किंवा सल्ला घेण्यासाठी म्हणून आलेल्या महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे अशोक खरातचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर काही आर्थिक व्यवहारांमध्येदेखील अशोक खरातचा सहभाग असल्याचं समोर आल्याने चौकशी सुरू झाली. त्याचपाठोपाठ रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकीय मंडळींचा अशोक खरातशी नियमित संपर्क असल्याचे आरोप झाल्यामुळे राजकीय सुंदोपसुंदीदेखील पाहायला मिळाली. याचसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक शब्दांत टिप्पणी केली आहे.
अशोक खरात प्रकरणावरून सध्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या जोरकसपणे आरोप करताना दिसत आहेत. अंजली दमानियांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशोक खरातचा सीडीआर रिपोर्टच जाहीर केला असून त्याच्याशी कोण-कोण किती वेळ फोनवर बोललं, याची यादीच त्यांनी वाचून दाखवली. त्यात सर्वाधिक वेळ त्यांची मुलगी तर दुसऱ्या क्रमांकावर रुपाली चाकणकर यांचं नाव होतं. यावरून आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. याअनुषंगाने मुंबईत एका कार्यक्रमाला निमंत्रित म्हणून उपस्थित असणारे राज ठाकरे यांनी खरात प्रकरणावरदेखील आपल्या भाषणात भाष्य केलं.
अशोक खरात प्रकरणावर काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरेंनी अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करत महाराष्ट्रातलं सध्याचं चित्र चांगलं नसल्याचं म्हटलं. “हा तोच महाराष्ट्र आहे का मला प्रश्नच पडतो. कुठे तो साधूसंतांचा महाराष्ट्र, कुठे आमचे गाडगे महाराजा आणि आजची अवस्था काय आहे? शेताला पाणी नाही पण खरातला पाणी आहे. कोणतरी खरात कुठूनतरी आलाय. शेताला पाणी मिळत नाही, आमच्याकडे सिंचनाची बोंब आणि खरातला पाणी मिळतंय. हे बाबा आमचे. ही महाराष्ट्राची अवस्था”, असं राज ठाकरे म्हणाले.
“ही प्रकरणंही राजकारणाच्या सोयीनेच बाहेर येतात. वाईट म्हणून बाहेर येत नाहीत. आता कुणाचीतरी बत्ती लावायची. कुणाचीतरी वाट लावायची यासाठी ठेवणीतल्या गोष्टी अशा वेळी बाहेर काढायच्या. हे काही महाराष्ट्रासाठी चांगलं चित्र नाहीये. आशा करुयात भविष्यात ते लवकरात लवकर सुधरेल”, असंही राज ठाकरे म्हणाले.
आचार्य अत्रे हे रावण होते – राज ठाकरे
दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरेंनी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची एक आठवण सांगताना त्यांना रावणाची उपमा दिली. तसेच, आपण असं का म्हणतोय, याचंही सकारण स्पष्टीकरण त्यांनी दिलं. “पूर्वी दादरला एका व्यक्तीच्या परिसरात मोर आला. तो मोर त्या व्यक्तीने मारून टाकला. ही बातमी आचार्य अत्रेंना कळली. त्यांनी ‘मराठा’मधून त्याला धो-धो धुतला. त्यानंतर कदाचित त्या माणसानं रविवारी कोंबडीही मारली नसेल”, असं सांगतानाच राज ठाकरेंनी आचार्य अत्रेंमधील विद्वत्तेचं कौतुक करताना रावणाचं उदाहरण दिलं.
“आपण रावणाकडे वेगळ्या अर्थाने बघतो. रामायणामुळे आपण राम हिरो आणि रावण व्हिलन असं ठरवून टाकलं आहे. खरंतर रावण विद्वान होता. त्याची १० तोंडं ही विद्वत्तेची वेगवेगळी रुपं होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने तसं बघायला गेलं तर आचार्य अत्रे तशा अर्थाने रावणच होते. त्यांच्याकडे तशीच विद्वत्तेची १० तोंडं होती. असं काही नव्हतंच जे त्यांना माहिती नाही. ते वक्ते होते, लेखक होते, संपादक होते, कवी होते, विनोदवीर होते, चित्रपटकार होते. मला खंत याच गोष्टीची आहे की मी आचार्य अत्रेंना पाहू शकलो नाही”, असं म्हणत राज ठाकरेंनी खंत व्यक्त केली.
