scorecardresearch

“मुलगा परत हवा असल्यास दहा लाख रुपये घेवून या”; अपहरणानंतर पैसे मागणाऱ्या आरोपींना अटक

उस्मानपुरा पोलिसांनी सोमवारी सकाळी आरोपींना जालन्यातून अटक केली.

Crime scene representative photo
(प्रतिकात्मक छायाचित्र)

तरुणाचे अपहरण करून त्याच्या पित्याकडे १० लाखांची मागणी करणाऱ्या दोघांना उस्मानपुरा पोलिसांनी सोमवारी सकाळी जालन्यातून अटक केली. श्यामराव सीताराम पवार (५४) आणि शेख फयाजोद्दीन शेख मेराजौद्दीन (२३) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. एम. कादरी यांनी दिले.

मधुकर लहानु अवचरमल (५६) यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्‍यानुसार, २० मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्‍या सुमारास मधुकर अवचरमल यांचा मुलगा किशोर (३५) दुपारी तीन वाजेच्‍या सुमारास वैयक्तिक कामासाठी शहरामध्‍ये गेला होता. मात्र रात्री साडेनऊ झाले तरी तो घरी न परतल्याने मधुकर अवचरमल यांनी किशोरच्‍या मोबाइलवर संपर्क केला. मात्र किशोरचा मोबाइल बंद येत होता. रात्री दहा वाजेच्‍या सुमारास मधुकर अवचरमल यांच्या मोबाइलवर दोन्ही आरोपींनी फोन केला व तुमच्‍या मुलाला आम्ही जालना येथे आणले असून तो परत हवा असल्यास उद्या सकाळपर्यंत दहा लाख रुपये घेवून या अशी धमकी दिली. प्रकरणात उस्‍मानपुरा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी मोबाइलच्‍या माध्‍यमातून तपास करत दोन्ही आरोपींना जालना येथून अटक केली. त्‍यांची चौकशी केली असता, फिर्यादीच्‍या मुलाशी आमचा पैशांचा व्‍यवहार आहे. याच व्‍यवहारातून फिर्यादीच्‍या मुलाचे अपहरण केल्याचे आरोपींनी कबुली दिली. दोन्ही आरोपींना सोमवारी न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेले वाहन जप्‍त करायचे आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास करायचा आहे. पीडित तरुणाला कोणत्‍या ठिकाणी डांबून ठेवले व मारहाण केली याचाही तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 10 lakh demand for kidnapping of youth both were arrested abn

ताज्या बातम्या