परप्रांतीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करण्यासाठी कुंटणखान्यात डांबून ठेवल्या प्रकरणी न्यायालयाने दोघांना, पती व पत्नीला प्रत्येकी १० वर्षे व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी या खटल्याचा निकाल आज, शुक्रवारी दिला. नगरमध्ये हे प्रकरण गाजले होते.
अल्ताफ अब्दुल खाटिक (३०) त्याची पत्नी पूजा खाटिक (२६, दोघे रा. शिरपूर, धुळे) या दोघांना अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६चे कलम ५ (१) ड अन्वये तसेच पूजा हिला भादंवि कलम ३४२ अन्वये शिक्षा देण्यात आली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुरेश लगड यांनी युक्तिवाद केला. खटल्यात एकूण ११ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांना शिक्षा देण्यात आली. ६ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर दोघे अद्यापि फरार आहेत व एका आरोपीचे निधन झाले.
सुधाकर संग्राम कांबळे (२६, दापोडी, पुणे), राजू बाबाजी गोरे (२६, पुणे), आशा दामोधर पाटील (५९, धुळे), शांतिलाल संतोष धनगर (३४, शिरपूर), कृष्णमुरारी राजेंद्रकुमार गुप्ता (२७, जालन, उत्तर प्रदेश) व सरदार आनंदा यादव उर्फ अजय पाटील (३२, रा. येरवडा, पुणे) यांची खटल्यातून मुक्तता करण्यात आली. गोपाळ यादव माळी (धुळे) या आरोपीचे निधन झाले, तर बाबूशेठ (पूर्ण नाव नाही) व रामडय़ा उर्फ रोहिदास पांचाळ (रा. शिरपूर) हे दोघे अजूनही फरार आहेत.
उत्तर प्रदेशातील चौदा वर्षांची एक मुलगी भावी पतीबरोबर पुण्याहून शिर्डीला बोलेरो जीपमधून ३ जानेवारी २०१३ रोजी जाताना रस्त्यात नगरमधील सावेडी भागातील बिग बाजारसमोरील रस्त्यावर थांबले. एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपींनी मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून बेशुद्ध करून तिला शिरपूर येथे नेऊन कुंटणखान्यात डांबले व वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. या घटनेची तक्रार प्रथम पुण्यातील कोरेगाव पार्क येथील पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. नंतर ती तपासासाठी नगरमध्ये तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. या प्रकरणात त्या वेळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते.