पूरग्रस्तांच्या खात्यात शुक्रवारपासून जमा होणार १० हजारांची मदत; विजय वडेट्टीवरांची माहिती

पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरु आहेत.

10000 will be credited to flood victims accounts from Friday Information on Vijay Vadettiwar
शुक्रवारपासून १० हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना दिलासा म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून घरातील साहित्य, कपडे, भांडी खरेदीसाठी तत्काळ १० हजार रुपयांची मदत वाटप सुरू करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरु आहेत. उद्या शुक्रवारपासून ही १० हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशई बोलताना ही माहिती दिली आहे. “पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर केली आहे. हे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर अनेक आरोप होतात. पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार आहे,” असं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

पूरग्रस्तांना वाढीव मदत देण्याची योजना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुराचा फटका आणि नुकसानीचा आढावा घेण्यात आला. प्रचलित नियमापेक्षा अधिक मदत द्यावी, असा मंत्रिमंडळाचा सूर आहे. परंतु अद्याप काही ठिकाणी पुराचे पाणी कायम आहेत. शेतीच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत.

कोकणातील आठ हजार २३७ हेक्टर शेतीचे नुकसान

नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त झाल्यावरच मदतीच्या पॅकेजबाबत निर्णय घेतला जावा यावर सर्वाचे एकमत झाले. परिणामी सध्या प्रचलित नियमानुसार तातडीने मदतीचे वाटप करण्यात यावे आणि अतिवृष्टीत आतापर्यंत २१३ लोकांचा मृत्यू झाला असून आठ जण बेपत्ता आहेत. तर ५२ लोक जखमी झाले असून ४०० जणावरे तसेच ६० हजार कोंबडय़ा दगावल्या आहेत. अतिवृष्टीमुळे १४०० गावांना फटका बसला असून पूरग्रस्त भागातील चार लाख ३५ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोकणातील १०४९ गावातील आठ हजार २३७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून १२०० घरांना फटका बसला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 10000 will be credited to flood victims accounts from friday information on vijay vadettiwar abn

ताज्या बातम्या