सोलापुरात आज रात्री आलेल्या अहवालानुसार एकाच दिवशी १०३ नवे  करोनाबाधित रूग्ण आढळून आले. तर तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. आणखी धक्कादायक म्हणजे जिल्हा कारागृहातील ३४ कैद्यांनाही करोनाने बाधित केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी शंभरपेक्षा अधिक रूग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काल गुरूवारी ८१ रूग्ण सापडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उच्चांकी स्वरूपात १०३ रूग्ण सापडल्यामुळे एकूण रूग्णसंख्या ८५१ झाली आहे. तर मृतांची संख्याही ७५ झाली आहे. आज करोनाशी संबंधित ४७८ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता, त्यात ७९ पुरूष व २४ महिला मिळून एकूण १०३ व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले.

जिल्हा कारागृहात तीन दिवसांपूर्वी एका कैद्याला करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर याच कारागृहातील एका कर्मचा-यालाही करोनाबाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील कैद्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असता त्यापैकी ३४ कैदी करोनाबाधित निघाले. आज सापडलेल्या अन्य रूग्णांमध्ये बार्शी तालुक्यातील जामागाव येथील तीन महिला व कुंभारीच्या विडी घरकुलातील एक महिला अशा चार ग्रामीण महिला करोनाग्रस्त झाल्या आहेत. दरम्यान, अद्याप ४९९ चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.