१०वी १२ वीच्या लेखी परीक्षा त्याच शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.

exams to be held online as well as offline
फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस

पेपरसाठी वाढीव वेळ, लेखीपरीक्षेनंतर प्रात्यक्षिक; शिक्षण विभागाचा दिलासा

मुंबई: राज्यमंडळाच्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांना अर्धातास वेळ वाढवून देण्यात येणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे करोनामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या परिक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला. त्या पाश्र्वाभूमीवर परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार, लेखीच होईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी सद्यस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी वेळ वाढवून देण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय विभागाने घेतले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

करोनाच्या पाश्र्वाभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक शाळेत एक वर्गखोली राखीव ठेवण्यात येणार असून परीक्षेपूर्वी शिक्षक, शिक्षणमंडळाचे कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

परीक्षा लेखीच

करोनाच्या पाश्र्वाभूमीवर परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. मात्र, परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार आणि लेखीच होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र दहावीचे १६ लाख तर बारावीचे १३ लाख विद्यार्थी परीक्षा देणार असून ग्रामीण भागात ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी  पुरेशी व्यवस्था नसल्याने दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे.

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा रद्द

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा यंदा रद्द करण्यात आली असून त्याऐवजी प्रकल्प, लेखनकार्य, गृहपाठ अशा स्वरूपात  २१ मे ते१० जून या कालावधीत ही परीक्षा घेतली जाईल. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २२ मे ते १० जून दरम्यान घेतली जाणार आहे. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करून पाच ते सहा प्रात्यक्षिकांवरच ही परीक्षा देण्याचे आदेश कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर १५ दिवसात लेखन कार्य, गृहपाठ द्यावे लागणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीत विद्यार्थी किंवा घरातील कोणाला करोनाची लागण झाल्यास किंवा टाळेबंदी, प्रतिबंधात्मक क्षेत्र, संचारबंदी आदी परिस्थिती असल्यास प्रात्यक्षिक परीक्षा किंवा गृहपाठ सादर करण्यासाठी १५ दिवस वाढवून देण्यात येतील.

विशेष परीक्षेचे नियोजन

परीक्षा कालावधीत करोनाची लागण झाल्यामुळे संसर्गामुळे, टाळेबंदी, प्रतिबंधात्मक क्षेत्र, संचारबंदी आदी कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी घेतली जाणारी पुरवणी परीक्षा दरवर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्ट दरम्यान होईल. या दोन्हीसाठी परीक्षा केंद्रे शहरी भागात ठरावीक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असतील.

शाळा-महाविद्यालयांत केंद्र

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लेखी परीक्षा त्यांच्याच शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणार आहेत. अपवादात्मक परिस्थितीत वर्ग खोल्या कमी पडल्यास जवळच्या शाळेत परीक्षा घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. लोकल किंवा बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हेच ओळखपत्र समजून सोबत पालकांनाही प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी वाढीव वेळ

सर्वसाधारणपणे ८० गुणांच्या परीक्षेसाठी तीन तासांचा वेळ दिला जातो. मात्र गेले वर्षभर ऑनलाइन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव पुरेसा झाला नाही. त्यामुळे यंदा लेखी परीक्षेसाठी ३०मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला असून ४० व ५० गुणांच्या प्रशद्ब्रापत्रिकेसाठी  १५ मिनिटे तर अपंग विद्यार्थ्यांसाठी एक तास वाढवून देण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 10th 12th written examination same school junior college akp

ताज्या बातम्या