पनवेलमध्ये शाळकरी मुलींच्या दोन गटांत जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींनी एकमेकांना मारहाण केली आहे. भररस्त्यावर विद्यार्थिनींच्या दोन गटात आधी बाचाबाची झाली आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना पनवेलमधील व्हीके हायस्कूलमधील आहे. आज दहावीचा पेपर संपल्यानंतर हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. पेपर सुटल्यानंतर शाळेच्या गेटबाहेर विद्यार्थिनींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. भररस्त्यावर हा प्रकार घडल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. यातील काहींनी ही घटना आपल्या मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद केली.
मुलींच्या दोन गटात नेमक्या कोणत्या कारणामुळे हा वाद झाला? याची माहिती अद्याप समजू शकली नाही. भांडणाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. दहावीच्या मुलींनी भररस्त्यावर अशाप्रकारे हाणामारी केल्याने परिसरात या भांडणाची चर्चा सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.