कवठे एकंद स्फोटातील मृतांची संख्या ११ वर

तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे सोमवारी झालेल्या दारू कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ झाली असून, यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे.

Gas Cylinder Blast in Thane, ठाण्यात अँब्युलन्समध्ये स्फोट

तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे सोमवारी झालेल्या दारू कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ झाली असून, यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे. गावातील गुरव कुटुंबातील सर्व मृतदेहांवर आज सामूहिक अंत्यविधी करण्यात आला. या दुर्घटनेमुळे १५ हजार लोकवस्तीचे गाव सुन्न झाले असून, आज सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या स्फोटाच्या कारणांचा सखोल तपास करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी आज दिले.
सोमवारी कवठे एकंद येथील ईगल फायर वर्क्स या फटाका कारखान्यामध्ये स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत मृत झालेल्यांची संख्या ११वर पोहोचली. यामध्ये जुबेदा नदाफ, इंदाबाई गुरव आणि सुनंदा गिरी या तीन महिलांचा समावेश आहे. अन्य मृतांमध्ये अनिकेत गुरव, शरद गुरव, राम गिरी, राजेंद्र गिरी, तानाजी शिरतोडे, रोहित गुरव, शिवाजी गुरव आणि अजित तोडकर यांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील प्रवीण कुमार मदने हा नागाव कवठे येथील तरुण अद्याप अत्यवस्थ असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.
या दुर्घटनेतील गिरी कुटुंब मूळचे तुळजापूरनजीकच्या तीर्थबुद्रुक येथील असून, त्यांच्या मृतदेहावर त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला. फटाका कारखान्याचे मालक रामचंद्र गुरव यांच्या कुटुंबातील ४ जण यामध्ये मृत झाले असून त्यांच्यावर आज सामूहिक अंत्यविधी करण्यात आला. अपघातात मृत झालेले अजित तोडकर हे वारणा कोडोलीचे फटाका व्यापारी असून ते खरेदीसाठी आले होते.
या प्रकारामुळे कवठे एकंद आज सुन्न झाले होते. आज दिवसभर गावातील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. घडल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त होत होती. आगीच्या कारणाचा अद्याप शोध लागला नसला तरी पत्र्याच्या शेडमध्ये अगोदर स्फोट झाला. वाढत्या उष्णतेने ज्वालाग्राही पदार्थाचा स्फोट प्रथम झाला असावा असा कयास आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेची कसून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच उद्यापर्यंत शासनाचे रासायनिक पृथक्करण पथकही पाहणी करून प्रशासनाला आपला अहवाल देणार आहे.
फटाक्याच्या कारखान्यात गंधक, बेरियम नायट्रेट, सुरमीठ, अॅल्युमिनियम पावडर या अत्यंत ज्वलनशील पदार्थाचा साठा होता. फटाका तयार करण्याच्या कारखान्यापासून जवळच असलेल्या एका गोदामालाही आग लागली. त्याच ठिकाणी हे सर्व काम करीत होते. अशी माहिती उपलब्ध झाली असली तरी दुर्घटनेतील एक जखमी वगळता अन्य कोणीही वाचलेले नाही, यामुळे नेमका स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप निष्पन्न झालेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 11 died in kavathe ekand explosion

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या