नागपूरमध्ये करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याची अधिकृत घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली होती. या इशाऱ्यानंतर आता अगदी लगेचच जिल्ह्याची आणि पर्यायाने राज्याची चिंता वाढवणारी एक बातमी आहे. नागपूर जिल्ह्यातील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा मोठा इशारा आहे. हिंगणा शहरालगतच्या वनडोंगरी भागात असलेल्या दत्त मेघा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन दिलीप गोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ११ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण केले आहेत.

१०० हून अधिक विद्यार्थी विलगीकरणात

दत्त मेघा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन दिलीप गोडे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “तपासणीनंतर आता या महाविद्यालयाच्या वसतिगृहातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. वसतिगृहातील दोन मुलींना रविवारी ताप आला होता. त्यानंतर त्यांची करोना चाचणी केली गेली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर, आम्ही सर्व विद्यार्थ्यांची लक्षणं तपासली. त्यावेळी आणखी नऊची जणांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.” दरम्यान, निश्चितच ही धोक्याची घंटा मानावी लागेल.

“संसर्ग नेमका कुठून झाला हे सांगणं कठीण”

गोडे यावेळी असंही म्हणाले की, “या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. कारण, व्हायरसचा त्रास कमी आहे आणि ऑक्सिजन सॅच्युरेशनची पातळी देखील चांगली आहे.” या महाविद्यालयाने याच वर्षीपासून कामाला सुरुवात केली आहे. सध्या इथे फक्त एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थी आहेत.”अलीकडे आमच्या रुग्णालयात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. परंतु, या सर्वांचीच विशेषतः या रुग्णांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींची करोना चाचणी होऊ शकत नाही. त्यामुळे संसर्ग नेमका कुठून झाला हे सांगणं कठीण आहे”, असं गोडे यावेळी म्हणाले.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये देशात करोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे, असून आधीच्या अनुभवनातून शिकून अधिक खबरदारी घेणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. हा काळ देखील सण-उत्सवांचा आहे. परंतु, वारंवार शासन आणि प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना करोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचसोबत, पात्र व्यक्तींनी करोना लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण करणं देखील तितकंच आवश्यक आहे.