नांदेडमधून १,१२७ किलो गांजा जप्त ; मुंबई एनसीबीची कारवाई

आंध्र प्रदेशात नक्षली भागात गांजाची शेती करून त्याचे वितरण केले जाते. यापूर्वीही कारवायांमध्ये हे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : अमलीपदार्थ नियत्रण विभागाने (एनसीबी) नांदेडमध्ये केलेल्या कारवाईत १,१२७ किलो गांजा पकडला असून याप्रकरणी एका ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातून राज्यात वितरणासाठी येत होता. याच्या वितरणामागे नक्षलवादी गटाचा सहभाग आहे का, याबाबत एनसीबी तपास करत आहे.

हैदराबाद नांदेड मार्गावर नायगाव तालुक्यातील मंजरम येथे एनसीबीने सोमवारी सकाळी ही कारवाई केली. आंध्र प्रदेशातून काही संशयित लोखंडी सळय़ांमध्ये लपवून गांजा घेऊन येत असल्याची माहिती मुंबई एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार नांदेडमध्ये सापळा रचण्यात आला होता. ज्यावेळी हा ट्रक राज्याच्या हद्दीत दाखल झाला. त्यावेळी त्याला संशयावरून थांबवण्यात आले. तपासणीत ट्रकमध्ये लोखंडी सळय़ांमध्ये ४४ गोणी गांजा लवपून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. एनसीबीने एकूण १,१२७ किलो गांजा जप्त केला असून त्यांची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

आंध्र प्रदेशात नक्षली भागात गांजाची शेती करून त्याचे वितरण केले जाते. यापूर्वीही कारवायांमध्ये हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या या गांजामागे नक्षलवाद्यांचा सहभाग आहे का, याबाबतही एनसीबी तपास करत आहे.  आरोपींनी यापूर्वीही गांजाचे वितरण केल्याचा संशय असून त्याबाबत तपास सुरू असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 1127 kg cannabis seized in nanded zws

ताज्या बातम्या