रवींद्र जुनारकर, गडचिरोली

बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश, ओडिसा, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड व आंध्रप्रदेश या नऊ राज्यांत पोलिसांशी चकमकीत ११९ नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये ३९ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे, अशी कबुली नक्षवाद्यांनी दिली असून २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत अमर शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. नर्मदा व किरणकुमार यांना बिनशर्त सोडून द्यावे, अशीही मागणी या पत्रकात करण्यात आली आहे. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी, कोरची, कुखेडा भागात ही पत्रके मोठय़ा प्रमाणात मिळाली आहेत.

दंडकारण्य चळवळीचे नेते कॉ. नर्मदा व किरणकुमार यांच्या अटकेमुळे नक्षलवादी चळवळ खिळखिळी झाली असतानाच गेल्या वर्षभरात देशातील नऊ राज्यांमध्ये ११९ नक्षलवादी ठार झाले आहेत. यात बिहार व झारखंड येथे ३, पूवरेत्तर झारखंड १, जनदंडकारण्यातील ९६, आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर १४, तेलंगणा १, ओडिशा ३, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश परिसरात २, आंध्रप्रदेश १ असे ११९ जण ठार झाले आहेत. यामध्ये ३९ महिलांचा समावेश आहे. त्यातही पाच डीवीसी सदस्य,  मीना, रोशनी ऊर्फ बंददो, भीमा ऊर्फ सूर्या, रामको नरोटी, जमुना, २० पीपीसी सदस्य, २० जन पार्टी पीएलजी सदस्य, ८ आरपीसी अध्यक्ष व जन संगठनचे ४२, जन मिलिशिया कॉमरेडच्या १३ सदस्यांचा समावेश आहे. चकमकीत ठार झालेल्या नऊ नक्षलवाद्यांची माहिती अजून मिळालेली नाही.