कराड : अमेरिका, इस्राइल आणि इराण यांच्यात संघर्षाचा भडका उडाल्याचे पडसाद दुबईतही उमटले. देशाबाहेरील विमानसेवाही ठप्प झाल्याने एका खासगी विमा कंपनीचे प्रतिनिधी व त्यांचे नातेवाईक असे १७ जण दुबईत अडकून पडलेत. त्यातील १२ जण कराड व तालुक्यातील असून, उर्वरित पाचजण अन्य ठिकाणचे असल्याची माहिती कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली.

विमा कंपनीच्या चर्चासत्रासाठी (सेमिनार) राज्यातून चारशे प्रतिनिधी बुधवारी २६ फेब्रुवारीला दुबईला रवाना झाले. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चिपळूण, नाशिक जिल्ह्यांतील अधिकारी, प्रतिनिधी यात सेमिनारमध्ये सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मध्यपूर्वेत अचानक युद्ध सुरू होऊन तणाव वाढल्याने देशाबाहेरील विमान प्रवास व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले.

देशाबाहेरील विमान सेवा अचानक ठप्प झाली. ही विमान सेवा कधी, कशी सुरू होईल हे सध्या तरी स्पष्टपणे सांगता येत नाही. आणि अशातच कराडमधील विमा प्रतिनिधी पी. व्ही. जाधव यांच्यासह शारदा जाधव, सतीश जाधव, उमेश सूर्यवंशी, सुनील कचरे, साधना पाटील, विपुल नाईगडे, महेश ढेकळे आणि संतोष माने आदी विमा अधिकारी व प्रतिनिधी चर्चासत्रासाठी दुबईत गेले आहेत. असून , कार्यक्रमासाठी गेलेले हे विमा प्रतिनिधी, अधिकारी आणि त्यातील काहींचे नातेवाईक दुबईमध्येच अडकून पडले आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी व हितचिंतकांमध्ये अस्वस्थता व चिंतेचे वातावरण आहे.

या एकूणच घडामोडींची माहिती मिळताच राज्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय नियोजन कक्ष सक्रिय करण्यात आले आहेत. सातारा जिल्हा प्रशासनाने कराडमधील व अन्य ठिकाणच्या दुबईत अडकलेल्या प्रतिनिधींची व सोबतच्या इतर लोकांशी संपर्क साधून त्यांची माहिती घेतल्याचे कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले.

प्रशासनाच्या माहितीनुसार, या युद्धाच्या व विशेषतः दुबईतील परिस्थितीवर शासन, प्रशासनाचे बारकाईने व गांभीर्याने लक्ष असून, तेथील भारतीय दूतावासाशी समन्वय साधला जात आहे. सतत संपर्क ठेवला जात आहे. संबंधित विमा कंपनी आणि प्रवास सहल आयोजकांकडून दुबईत अडकलेल्या सर्वांची सुरक्षा, निवास व भोजनाची व्यवस्था झाली आहे. दुबईतून विमान प्रवास सेवा सुरु होताच दुबईत अडकलेल्या सर्व नागरिकांच्या परतीच्या प्रवासाबाबत निर्णय होणार आहे. दुबईत अडकलेल्या नागरिकांच्या सुखरूप परतीसाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रार्थना केली जात आहे. दुबईत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी ठोस व जलद पावले उचलली जावीत अशी मागणी होत आहे.