सुहास बिऱ्हाडे

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने शहरात तब्बल १२ उड्डाणपूल बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या १२ पुलांचा एकूण प्राथमिक खर्च ३०४ कोटी असून तो मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत बनविले जाणार आहे. त्यापैकी वसईत ४, नालासोपारामध्ये ३ आणि विरार शहरात ५ उड्डाणपुलांचा समावेश आहे.

वसई विरार शहरात झपाटय़ाने नागरिकीकरण होत आहे. नवनवीन वसाहती विकसित होत आहेत. वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर एवढे आहे. शहराची लोकसंख्या २२ ते २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील रस्ते अरुंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेने आता शहरातील वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यासाठी मेसर्स टंडन अ‍ॅण्ड कंपनीला सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्यांनी शहराचे रस्ते, वाढती लोकसंख्या, वाहने यांचा अभ्यास करून आपला अहवाल सादर केला होता. त्यानुसार शहरात १२ उड्डणापुलाची गरज व्यक्त करण्यात आली होती. शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पालिकेने वाहतूक कोंडी होणारे प्रमुख नाके आणि रस्त्यांवर १२ उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा प्राथमिक अंदाजित खर्च हा ३०४ कोटी रुपयांच्या घरात आहे. हे सर्व उड्डाणपूल एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधले जाणार आहे. या कामाला आर्थिक मंजुरी मिळण्यासाठी या उड्डाणपुलांचा प्रस्ताव येत्या महासभेत सादर केला जाणार आहे.

वसईतील माणिकपूर नाका, बाभोळा वसई पूर्वेच्या गोखिवरे रेंज नाका, नवघर पूर्व येथे ४ उड्डाणपुलांचा समावेश आहे. नालासोपारामधील श्रीपस्थ पाटणकर पार्क जंक्शन, चंदननाका, लक्ष्मी शॉपिंग सेंटर येथे ३, तर विरारमध्ये बोळिंज-खारोडी, विज्ञान उद्यान, मनवेल फाटा, फूलपाडा जंक्शन आणि नारिंगी साईनाथनगर या ५ ठिकाणी मिळून एकूण १२ उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उद्देशाने आम्ही या उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली. या पुलांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याआधी महासभेची मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी पुलांच्या बांधकामांचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्यात येणार आहे, असे आयुक्त बी. जी. पवार यांनी सांगितले.

प्रस्तावित उड्डाणपूल

ठिकाण                      खर्चाची रक्कम

माणिकपूर नाका               २८ कोटी ९६ लाख

रेंज ऑफिस, गोखिवरे           १९ कोटी ८१ लाख

श्रीपस्थ पाटणकर पार्क जंक्शन    १५ कोटी ५६ लाख

चंदननाका जंक्शन              १९ कोटी ११ लाख

लक्ष्मी शॉपिंग सेंटर                  ५० कोटी २३ लाख

बोळिंज खारोडी नाका           १६ कोटी ८९ लाख

विज्ञान उद्यान                १६ कोटी ८९ लाख

मनवेल फाटा                       १८ कोटी २२ लाख

फूलपाडा जंक्शन               १८ कोटी ८९ लाख

बाभोळा नाका                 ३१ कोटी ८१ लाख,

नवघर (पू) वसंतनगरी          ५१ कोटी ४४ लाख

नारंगी, साईनाथनगर           १६ कोटी ८९ लाख