उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या अपघातांत १२ ठार

अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

छायाचित्र प्रतिकात्मक

अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उत्तर महाराष्ट्रात गुरूवारी सकाळी नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्य़ात झालेल्या अपघातांच्या दोन घटनांमध्ये १२ ठार तर ११ जण जखमी झाले. मालेगाव-सटाणा रस्त्यावरील शेमळी गावालगत पहाटे वाहनाने अॅपेरिक्षाला धडक दिल्यामुळे सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर नंदुरबार जिल्ह्य़ात मालमोटार आणि अॅपेरिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाच ठार तर ११ जण जखमी झाले. या घटनांमुळे अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सटाणा शहरातील यात्रोत्सवात खेळणे विक्रीचा व्यवसाय करणारे सहा व्यावसायिक माल खरेदीसाठी मुंबईला गेले होते. माल खरेदी करून गुरूवारी पहाटे ते मालेगाव येथे उतरले. मालेगावहून अॅपे रिक्षाने सटाण्याकडे जात असताना अज्ञात वाहनाने एका वळणावर अॅपे रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यात्रोत्सवातील शेकडो व्यावसायिकांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयात आक्रोश केला.

दरम्यान, शेकडो कोस दूर व्यवसायासाठी आलेल्या सहकारी व्यापाऱ्यांचे शव गावाकडे पोहचविण्यासाठी आर्थिक मदत म्हणून व्यापाऱ्यांनी अवघ्या दहा मिनिटात सव्वा लाख रुपये जमा करून दिले तर सटाण्यातील काही दात्यांनी ८० हजार रुपयांची मदत दिली. यामुळे नाशिक येथून शववाहिकेला पाचारण करून उत्तर प्रदेशमधील व्यापाऱ्यांचे मृतदेह गावाकडे रवाना करण्यात आले. अपघाताची दुसरी घटना नंदुरबार जिल्ह्य़ात घडली. शहादा-धडगाव रस्त्यावर अॅपेरिक्षा आणि मालमोटार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत  पाच ठार तर ११ जण जखमी झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 12 killed in road accident at maharashtra