UK Doctor Dr Sangram Patil Facebook Post Case: भाजपाविरोधात पोस्ट केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यामुळे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉ. संग्राम पाटील (वय ४९) यांना ४ महिने भारतातच अडकून पडावे लागले होते. मुंबई पोलिसांच्या लूक आऊट सर्क्युलरमुळे त्यांना १९ जानेवारी रोजी भारताबाहेर जाता आले नव्हते. अखेर ५ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अश्विन डी भोबे यांच्या एकलपीठाने दिलेल्या निर्णयामुळे ब्रिटिश नागरिक संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला. एका फेसबुक पोस्टमुळे त्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला. या प्रकरणात आतापर्यंत काय काय झाले? उच्च न्यायालयाच्या दिलासादायक निकालानंतर डॉ. संग्राम पाटील काय म्हणाले? हे पाहू.

यूकेमध्ये परतण्याची परवानगी मिळाल्यानंतरही आपण महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करत राहू, अशी लेखी हमी डॉ. पाटील यांनी उच्च न्यायालयात दिली होती. राज्य सरकारने हे हमीपत्र स्वीकारले. तसेच त्यानुसार पाटील यांना बजावण्यात आलेल्या लूक आऊट सर्क्युलर (एलओसी) मध्ये ११ मे पूर्वी बदल केले जातील, असे राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर मंगळवारी ते यूकेला परतले.

डॉ. संग्राम पाटील हे यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) येथे ते भूलतज्ज्ञ म्हणून नोकरी करतात. भारतातील कायदेशीर संघर्षामुळे त्यांना नोकरीत परतता येत नव्हते. एनएचएसकडून वारंवार नोटीस मिळाल्यानंतर त्यांची नोकरी जाण्याचा धोका निर्माण झाला होता.

५० लाख आणि चार महिन्यांचे वेतन गमावले

द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना डॉ. संग्राम पाटील म्हणाले, “मी वेळेवर कामासाठी उपस्थित राहू शकत नसल्यामुळे माझ्या वरिष्ठांनी मला अनेकदा नोटीस बजावली. एका फेसबुक पोस्टमुळे चार महिने तुम्हाला ताब्यात कसे ठेवले जाऊ शकते, हे त्यांना रुचत नव्हते. ते चार महिने खूपच त्रासदायक होते. आर्थिकदृष्ट्याही बरेच नुकसान झाले. कायदेशीर लढाईसाठी जवळपास ५० लाखांचा खर्च आला. शिवाय चार महिन्यांचे वेतनही गमवावे लागले.”

संग्राम पाटील पुढे म्हणाले, न्यायालयाच्या सुनावणीत सहभागी होण्यासाठी मी माझ्या पत्नीसह जळगावहून मुंबईला आलो. आम्ही दोघे एकत्रच यूकेला जाऊ अशी आम्हाला आशा होती. ११ तारखेपर्यंत आम्हाला यूकेमध्ये परतता येईल, असे प्रयत्न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.

यूकेमध्ये परतल्यानंतर डॉ. संग्राम पाटील यांचा पहिला व्हिडीओ

मागे वळून पाहताना डॉ. संग्राम पाटील यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे. एका छोट्याशा फेसबुक पोस्टमुळे इतके वाईट का घडले? असा प्रश्न त्यांना सतावतो. “सोशल मीडियावरील काही शब्दांच्या वाक्यामुळे एफआयआर आणि त्यानंतर लूक आऊट सर्क्युलर कसे काय लागू शकते? मी इतका काळ मुलांपासून दूर राहिल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली, माझ्या पत्नीला त्रास झाला आणि नोकरीही जवळपास गमावण्याची शक्यता होती”, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

प्रकरण काय आहे?

डॉ. पाटील यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये, भाजपासह त्याच्या प्रमुख नेत्यांबद्दल काही मजकूर प्रसिद्ध केला होता. यानंतर भाजपाचे महाराष्ट्र युनिटचे सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे यांनी पाटील यांच्याविरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात १८ डिसेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल केली. ज्यामुळे पाटील यांच्याविरोधात एलओसी जारी करण्यात आली.

dr sangram patil in high court
जानेवारी ते एप्रिल २०२६ असे चार महिने मुंबई उच्च न्यायालयात डॉ. संग्राम पाटील यांच्या प्रकरणावर सुनावणी झाली. (Photo – Dr Sangram Patil Facebook)

एफआयआरमध्ये दोन पोस्टचा उल्लेख होता. एका पोस्टमध्ये भारतातील नेत्याचे आंतरराष्ट्रीय घोटाळ्यावर मौन का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच ‘शहर विकास आघाडी’ नावाच्या अकाऊंटवरून केलेल्या दुसऱ्या एका पोस्टचा उल्लेख होता. एका नेत्याचा काही लोकांशी संबंध असल्याचे म्हटले होते. पाटील यांनी नंतर स्पष्ट केले की, शहर विकास आघाडी अकाऊंटशी त्यांचा कोणताही संबंध नाही.

फेसबुक पोस्टबद्दल काय म्हणाले डॉ. संग्राम पाटील?

चार महिन्यांच्या त्रासदायक अनुभवानंतर आता मागे वळून पाहताना ती पोस्ट टाकल्याचा पश्चाताप होतो का? असा प्रश्न विचारला असता डॉ. पाटील म्हणाले, “मला असे वाटत नाही. मुळात मी टाकलेल्या पोस्टमध्ये वावगे काही नव्हते. या पोस्टवर भारतीय न्याय संहितेचे कलम ३५३ (२) लावले गेले होते. हे कलम वेगवेगळ्या धार्मिक, वांशिक, सामाजिक गटांमध्ये वैर निर्माण करणाऱ्या पोस्टविषयी आहे. हे कलम माझ्या पोस्टला लागू होत नाही. माझी पोस्ट कोणत्याही समुदायाला लक्ष्य करत नव्हती किंवा त्यात द्वेषपूर्ण असे काही नव्हते.”

“एका सामान्य माणसाने सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे कुणी दुखावत असेल तर त्याबद्दल मला खेद वाटतो. पण कुणालातरी वाईट वाटणे आणि गुन्हा ठरणे यात फरक आहे. तुम्ही एखाद्या पोस्टबाबत आक्षेप घेऊ शकता पण त्याविरोधात एफआयआर दाखल करू शकत नाहीत”, असेही डॉ. संग्राम पाटील म्हणाले.

कोण आहेत डॉ. संग्राम पाटील?

डॉ. संग्राम पाटील हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचे रहिवासी होते. २००४ साली ते कामानिमित्त यूकेला गेले आणि तिथे ते २००९ पर्यंत राहिले. पाटील पुढे म्हणाले, “मला काहीतरी करायचे होते, त्यामुळे मी भारतात परतलो. मी २००८ पासून सरकारविरोधात लिहित आलो आहे. मी विविध भ्रष्टाचारविरोधी, स्त्री भ्रूणहत्याविरोधी आंदोलनांमध्ये सहभागी होतो, अण्णा हजारे आंदोलनाचाही एक भाग होतो. काही आंदोलनांसाठी रस्त्यावरही उतरलो होतो. पण माझ्यावर अशी कोणतीही कारवाई कधी झाली नव्हती.”

dr sangram patil in india
पुरोगामी विचारांना मानणारे डॉ. संग्राम पाटील हे सातत्याने व्यवस्थेविरोधात लिखाण करत आले आहेत. (Photo – Dr Sangram Patil Facebook)

पाटील पुढे म्हणाले, “२०१५ पर्यंत जळगावमधील गरीबांसाठी काम केल्यानंतर मी पुन्हा यूकेला गेलो. माझी मुले तिथेच जन्मली आणि वाढली. त्यानंतर मी वर्षातून एकदा भारतात येत राहिलो.” अलीकडेच डॉ. संग्राम पाटील यांना यूकेचे नागरिकत्व मिळाले होते.

“कोविडकाळात जनजागृती केल्यामुळे माझ्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये वाढ झाली होती. तेव्हाही मी राजकीय मते व्यक्त करायचो. माझ्या जवळच्या लोकांनी मला याबद्दल आधीच सावध केले होते. मी उघडपणे प्रश्न उपस्थित करत असल्यामुळे मला लक्ष्य केले जाऊ शतके, असे काहींनी सांगितले होते. माझ्या पोस्टमुळे मला वाईट परिणामांचा सामना करावा लागू शकतो, याची कल्पना होती. पण फेसबुकवरील काही वाक्यांमुळे एफआयआर दाखल होऊन थेट ४ महिन्यांच्या नजरकैदेत राहावे लागेल, याची कधीही अपेक्षा केली नव्हती”, अशी खंतही डॉ. पाटील यांनी बोलून दाखवली.

चौकशीच्या अनुभवाबद्दल काय म्हणाले?

पोलिसांनी केलेल्या चौकशीबाबत डॉ. संग्राम पाटील म्हणाले, माझी शेवटची चौकशी २१ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली. मी पोलीस विभागाला जवळपास १५ ईमेल केले. जर तुम्ही मला जाऊ देत नसाल तर माझी चौकशी करा, तुमचे प्रश्न विचारा. जर तुम्हाला फेसबुक, मेटा यांच्याकडून काही माहिती मिळाली असेल तर त्यावर माझी चौकशी करा. पण जर तुम्ही मला प्रतिसाद देणार नसाल तर ब्रिटनला जाण्याची परवानगी द्या, कारण मी पूर्णवेळ नोकरी करतो. मात्र हे सांगूनही मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

पाटील मंगळवारी यूकेला रवाना

आता तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करणार का? असा प्रश्न विचारला असता डॉ. संग्राम पाटील म्हणाले, माझे सर्व सोशल मीडिया प्रोफाइल अजूनही सक्रिय आहेत. फेसबुक, युट्यूब, एक्सवर मी पोस्ट करत आहे. भारतात मी पर्यटन व्हिसावर आलो आहे. त्यामुळे मी राजकीय विषयांवरील पोस्ट करणे थांबवले आहे. एका नागरिकाला जे विशेषाधिकार मिळतात, ते कदाचित मला मिळणार नहीत. पण मी भविष्यात व्यक्त होण्यापासून परावृत्त व्हावे, असे कोणतेही कारण सध्यातरी दिसत नाही.

मंगळवारी (१२ मे) सकाळी पाटील यूकेला जाणाऱ्या विमानात बसले. सुरुवातीला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी दिली. मंगळवारी सायंकाळी पाटील यूकेमधील आपल्या घरी पोहोचले.