Maharashtra ZP and Panchayat Samiti Elections 2026 : राज्यातील महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर केली आहे. आता १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार, तर ७ फेब्रुवारी रोजी या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने फक्त १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचीच निवडणूक का जाहीर केली? उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक कधी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण याबाबत देखील राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी मोठी माहिती दिली आहे.
निवडणूक आयुक्तांनी काय म्हटलं?
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली. मात्र, उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक कधी होणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी म्हटलं की, “आम्ही आज १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर केली. पण आता उर्वरित ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आहेत, त्यांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप काही निर्देश दिलेले नाहीत. जेव्हा सर्वोच्च न्यायालय निर्देश देईल, त्यानुसार उर्वरित ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या आहेत, त्यांची निवडणूक घेतली जाईल”, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितली.
कोणत्या १२ जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर झाली?
कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
मराठवाडा विभाग : छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर
१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम कसा आहे?
नोटिफिकेशन : १६ जानेवारी रोजी निघणार
उमेदवारी अर्ज : १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी
अर्जाची छाननी : २२ जानेवारी २०२६
अर्ज माघारी : २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत
अंतिम यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी दुपारी ३.३० नंतर
मतदान : ५ फेब्रुवारी रोजी पार पडणार
मतमोजणी : ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता.
‘मतदाराला दोन मतं देणं बंधनकार’
“जिल्हा परिषदांच्या या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मत देणं बंधनकारक आहे. त्यातील एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि एक मत पंचायत समितीसाठी द्यावं लागेल. तसेच या निवडणुकीसाठी नामनिर्देश प्रतिक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे”, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
