सातारा : पंढरीच्या लक्षावधी वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन समस्येत तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका २४ तास वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत. राज्यात भारत विकास गृपद्वारे (बीव्हीजी) १०८ रुग्णवाहिका सेवेची अंमलबजावणी केली जाते. आजतागायत ८६४३ वारकऱ्यांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे. वारकरी बांधवांना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवेने पंढरपूर येथे नियंत्रण कक्ष तयार केला आहे. नियंत्रण कक्षाद्वारे पालखी सोहळ्याचे बारकाईने निरीक्षण करून तत्काळ आरोग्यसेवा देण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहेत. पायी वारी करताना भाविकांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी, अशी सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवेला केली होती. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी अवघ्या काही तासांतच १२० रुग्णवाहिका पालखी सोहळ्यासाठी तैनात केल्या. रुग्णवाहिकेद्वारे १२० डॉक्टर व १२८ चालक वारकऱ्यांना २४ तास आरोग्यसेवा अर्पण करत आहेत.

‘भारताचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या वारीत भाविकांना आरोग्य सेवा देण्याची संधी आम्हाला मिळतेय, हे मी माझे भाग्य समजतो. आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सूचनेनुसार अवघ्या काही तासांतच पालखी सोहळ्यासाठी १२० रुग्णवाहिकेचे नियोजन आम्ही केले. वारकऱ्यांना आरोग्यमय वारी अनुभवता यावी, यासाठी २४८ आरोग्यदूत अहोरात्र कार्यरत आहेत, अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०८ रुग्णवाहिकेचे वारीचे नियोजन

मानाच्या १० पालख्यांसासह आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. यात ९० बेसिक लाईफ सपोर्ट व ३० ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट या प्रकारातल्या रुग्णवाहिका आहेत.