कर्जत : येथील दोन तरुणांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एकूण १४ जणांना अटक केली आहे. त्यातील दोन अल्पवयीन आहेत. आज, रविवारी न्यायालयापुढे हजर केलेल्या ५ जणांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. अटक केलेल्या आणखी ५ जणांना उद्या, सोमवारी  न्यायालयापुढे हजर केले जाईल. दरम्यान या घटनेसंदर्भात केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या पथकानेही माहिती घेण्यास सुरुवात केली असून त्यासाठी कर्जतमधील घटनास्थळी भेट दिली.

या घटनेसंदर्भात फिर्यादीने आय सपोर्ट नूपुर शर्माह्ण असे स्टेटस व्हाट्सअ‍ॅपवर ठेवले, इंस्टाग्रामवरही टाकले तसेच ‘तुला हिंदूंचा फार किडा आला आहे का, तुझा उमेश कोल्हे करणार’ असे म्हणून हल्ला केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनीही याची दखल घेतली आहे. तीन अधिकाऱ्यांनी काल घटनास्थळी भेट दिली तसेच आरोपींकडूनही माहिती घेतली. या गुन्ह्याला भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा प्रकरणाचा संदर्भ असला तरी दोन्ही गटातील पूर्व वैमनस्याचीही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही गटात कुरबुरी सुरू आहेत.  दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या दोघांना १० ऑगस्टपर्यंत न्यायालयाने यापूर्वीच कोठडी दिली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलीस यांनी एकत्रित तपास करीत गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी शाहरुख पठाण (२८), इलाई महबूब शेख (२०), अकीब कुदरत सय्यद (२४), टिपू सरीम पठाण (१८), साहिल शौकत पठाण (२३), अरशद शरीफ पठाण (२०), निहाल इब्राहिम पठाण (२०, सर्व रा. कर्जत) यांना आज अटक करण्यात आली.

आज न्यायालयापुढे हजर करण्यात आलेल्या सोहेल शौकत पठाण (२८), अब्रार उर्फ अरबाज कासम पठाण (२५), जुनैद जावेद पठाण (१९), हुसेन कासम शेख (४०, पुणे), अरबाज अजीज शेख (२४, दौंड) या पाच जणांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूत्ववादी संघटनांनी शुक्रवारी कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळला तर काल, शनिवारी सर्वपक्षीयांच्या बैठकीत शांतता व संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित, उपनिरीक्षक अमरजित मोरे, भगवान शिरसाठ, अनंत सालगुडे यांचे पथक करत आहे.