ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करायला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून तशी घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. या निर्णयामुळे गावांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा सुनियोजितपणे विकास करणं शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ गावांचा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत होता. याबाबत अनेकदा सदनात प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र प्रत्येकवेळी शासन सकारात्मक असल्याचे सांगून पूढे काहीच ठोस घडत नव्हते. चालू अधिवेशनात पुन्हा एकदा १४ गावांच्या समावेशाचा प्रश्न आमदार प्रमोद पाटील, डॉ. बालाजी किणीकर, गणेश नाईक, रविंद्र चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित केला होता.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिन्याभरापूर्वी सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आज अखेर यासंबंधी अधिकृत निर्णय झाला आहे. दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती.

१४ गावांना पुन्हा पालिका हवी

१४ गावांमध्ये ग्रामपंचायत असल्याने वाढत्या नागरिकीकरणानुसार गावात सुविधा पुरवू शकत नाहीत. शहरीकरण झपाटय़ाने वाढत असल्याने हा विकास गावांतही व्हावा म्हणून अशी मागणी येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षांपासून करत होते. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही गावे महापालिकेतून वगळली होती. त्यानंतर ती पुन्हा समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आधी गावे वगळा यासाठी हिंसक झालेले ग्रामस्थ नंतर महापालिका हवी अशी मागणी करू लागले होते.

१४ गावांचा नवी मुंबईत समावेश करणार; एकनाथ शिंदेंचं आश्वासन

ही १४ गावे सुरुवातीला नवी मुंबई महापालिकेत होती. वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावर ती वगळावीत यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. हा वाद इतका टोकाला गेला होता की गावातून निवडणूक अर्ज दाखल करणाऱ्या दोघा उमेदवारांची घरे जाळण्यात आली होती. अखेर तत्कालीन काँग्रेस सरकारने ती गावे वगळली. या काळात कोणतेही ठोस नियोजन प्राधिकरण नसल्याने गावांचा विचका झाला. तळोजा, कल्याण, शिळ रस्त्यावर प्रचंड गोडामे उभी राहिली. त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा गावे महापालिकेत घ्या अशी मागणी करत होते.

“ग्रामस्थांनी स्वतःच्या हाताने गावांचा विचका केला”

महापालिका नको म्हणत या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत स्वीकारली होती. या गावात जागोजागी बेकायदा बांधकामं उभी राहिली होती. शीळ तळोजा मार्गावर असलेली बेकायदा गोदामही या गावाचं देणं आहे. मोठे भंगार माफिया या रस्त्यावर खेटून व्यवसाय करतात. त्याकडे लक्ष द्यायची ग्रामपंचायतीची कुवत नव्हती आणि दुसरीकडे जिल्हा प्रशासन, पोलिसांनी डोळेझाक केली. महापालिका त्यावर वरचेवर कारवाई करत होती.

गावातील मोकळ्या गुरचरण जमिनीवर आरक्षण पडेल अशी भीती गावातील एका मोठ्या गटाला होती. शिवाय भंगार गोदाम मालक आणि जमीन मालकी असलेलं ग्रामस्थ, त्यांचे पुढारी अशी मोठी साखळी महापालिका नको यासाठी आग्रही राहिली. ग्रामस्थ नेत्याच्या बोलण्यात आले, हिंसक झाले. आणि याचमुळे पुढे गावांचा विचका झाला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 villages of navi mumbai included in municipal corporation sgy
First published on: 24-03-2022 at 13:53 IST