सातारा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथे स्मारक उभारणीसाठी १४२ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीस, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७.१७ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर नायगावात आनंद व्यक्त करण्यात आला. नायगाव येथे क्रांतिज्योतींच्या जयंतीदिनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या मागणीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार १४२ कोटी ६० लाखांचा आराखडा शासनास सादर करण्यात आला होता. त्यामध्ये पुतळा, चौथरा, कलादालन, महिला प्रशिक्षण केंद्र, कार्यालय, महिला निवासी वसतिगृह, विश्रांतीगृह, बैठक कक्ष, कॅन्टीन, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, शिल्पचित्रे, भित्तिचित्रे, पोहोच रस्ता, बागबगीचा, वाहनतळ, अग्निशामक यंत्रणा, पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृह, मलनिस्सारण, विद्युतीकरण, प्रेक्षागृह आणि सीसीटीव्ही यंत्रणा या कामांचा समावेश असून, त्यासाठीच्या निधीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
नव्या मंत्रिमंडळात जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रिपद मिळाल्यानंतर जिल्ह्यातील पहिल्यांदा आगमनावेळी त्यांनी २३ डिसेंबर २०२४ ला नायगाव येथे भेट देऊन सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले होते. त्या वेळी त्यांनी सावित्रीबाई फुले स्मारकासाठी मोठा निधी उपलब्ध केला जाईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे आपला शब्द पाळल्याचे गोरे यांनी नायगावकरांना सांगितले.
नायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षणासाठी भरघोस निधी दिला आहे. याबाबत धन्यवाद आहेतच. मात्र, या कामाबाबत पुढील कार्यवाहीही तत्काळ व्हावी आणि पुढील काही महिन्यांत प्रत्यक्षात काम सुरू व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. स्वाती जमदाडे, सरपंच, नायगाव (ता. खंडाळा)