राज्यातील करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असून सध्या हे प्रमाण ७२.६९ टक्के झालं आहे. तर दिवसभरात १४,८८८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ७,६३७ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

टोपे यांनी ट्विटद्वारे माहिती देताना म्हटले, “राज्यात आज १४,८८८ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ७,६३७ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण ५,२२,४२७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण १,७२,८७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२,६९ टक्के झाले आहे.”

दरम्यान, मुंबईला मागे सारून देशातील करोना हॉटस्पॉटचं नवं केंद्र बनलेल्या पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १६१७ रुग्ण आढळल्याने, एकूण रुग्णसंख्या ८७ हजार ३१७ वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार १०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १३६९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेर ७० हजार २६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.