मुंबई : देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्त्वपूर्ण अशा पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १५ जणांचा गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एकाला ‘पद्मविभूषण’ तीन पद्मभूषण आणि ११ जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर झाला. पद्मभूषण श्रेणीमध्ये राज्यातील तीन मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. यात प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक (कला), जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पीयूष पांडे (मरणोत्तर – कला) आणि बँकिंग क्षेत्रातील उदय कोटक (व्यापार व उद्योग) यांचा समावेश आहे.

पद्मश्री पुरस्कारांमध्ये छत्तीसगडमधील अतिदुर्गम बस्तर येथे आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे डॉ. राम गोडबोले आणि सुनीता गोडबोले या दाम्प्त्याला वैद्यकक्षेत्रातील, क्रिकेटपटू रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी आर्मिडा फर्नांडिस, समाजसेवेसाठी जनार्दन बापूराव बोथे आणि कृषी क्षेत्रासाठी श्रीरंग देवाबा लाड यांचा समावेश आहे. कला क्षेत्रातून भिकल्या लाडक्या धिंडा, माधवन रंगनाथन, रघुवीर तुकाराम खेडकर आणि सतीश शाह (मरणोत्तर) यांना हा सन्मान जाहीर झाला. व्यापार व उद्योग क्षेत्रातून अशोक खाडे व सत्यनारायण नुवाल आणि विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातून जुझेर वासी यांना हा सन्मान जाहीर झाला.

केंद्र सरकारने १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांना मरणोत्तर पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला. सार्वजनिक क्षेत्रात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. टी. थॉमस, कला क्षेत्रात ज्येष्ठ व्हायोलिनवादक एन. राजम, तर साहित्य व शिक्षण क्षेत्रात मल्याळम पत्रकार पी. नारायणन यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी, ज्येष्ठ अभिनेते ममूटी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन आणि भाजप नेते व्ही. के. मल्होत्रा यांनाही मरणोत्तर पद्मभूषण जाहीर झाला आहे. यंदाच्या पद्म पुरस्कार यादीत ९० महिला असून, परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकत्व असलेले परदेशस्थित या प्रवर्गातील सहा व्यक्तींचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण, महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू सविता पुनिया यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय, माजी जेएनयू कुलगुरू एम. जगदीश कुमार, प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेमपाटी, प्रोसेनजित चॅटर्जी यांचाही पद्मश्री पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे.