कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून औरंगाबादसारख्या जिल्ह्यत केवळ १७ बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. म्हणजे कौशल्य मिळाल्यानंतरही ८३ टक्के उमेदवार बेराजगारच आहेत. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेमध्ये करण्यात आलेले बदल तंत्रस्नेही आणि पारदर्शकतेला वाढविणारे आहेत. ज्या संस्थांमध्ये बेरोजगारांनी विविध ६२९ अभ्यासक्रम विकसित केले आहेत, त्या उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाते. तसेच संस्थांना दिले जाणारे मानधनही जर उमेदवारांना नोकरी लागली तरच पूर्ण मिळत असल्याने गैरव्यवहाराला चाप बसला असला, तरी कौशल्य मिळवूनही हाती काही लागत नसल्याचे दिसून येत आहे.

सहाशे तासांत कौशल्य विकसित करण्याचे विविध अभ्यासक्रम सुरू असले तरी ते प्राथमिक औद्योगिक ज्ञानावर तसेच ब्युटीपार्लर, केशकर्तनालय एवढय़ापुरतचे मर्यादित आहेत. मराठवाडय़ात केवळ १२० अभ्यासक्रम सुरू आहेत. त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी या  योजनेचा उपयोग व्हावा, असा हेतू असतानाही त्याचा लाभ पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे अधिकारी मान्य करतात. मात्र, पूर्वीच्या तुलनेत नुसतीच हजेरी घेतल्याचे नाटक करून रक्कम उचलण्याची पद्धत मात्र बंद झाली आहे. आजपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १३ हजार ८८७ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. आज घडीला सात हजार ५३२ प्रशिक्षणार्थी कौशल्य मिळवत असल्याची सरकारी आकडेवारी आहे. पण त्यातून केवळ दोन हजार २९६ जणांना रोजगार मिळाले आहेत. एका विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी  प्रतितास ३२ रुपये ५० पैसे एवढी रक्कम दिली जाते. ही रक्कम प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर ३० टक्के, प्रशिक्षणार्थी उतीर्ण झाल्यानंतर तेवढीच रक्कम दिली जाते. जर कौशल्य मिळवूनही नोकरी मिळत नसेल, तर प्रशिक्षित करणाऱ्या संस्थेची ४० टक्के रक्कम दिली जात नाही. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. अन्य कौशल्य देणाऱ्या योजनांमध्येही चांगला प्रतिसाद असल्याचे सांगण्यात येते. मात्र, निवडण्यात आलेले अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष लागणारी मनुष्यबळाची गरज यात कमालीची तफावत योजनेत पारदर्शकता आणूनही त्याचा फारसा लाभ मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

१. किती जणांना प्रशिक्षण दिले?

ल्ल प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्य़ामध्ये आजपर्यंत एकूण १३ हजार १८७ प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले असून सद्य:स्थितीत ७ हजार ५३२ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

२. किती जणांना प्रत्यक्षात रोजगार मिळाला?

ल्ल २ हजार २९६ युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात एकूण २१८ व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान राबविले जात आहे.

३. कोणत्या अभ्यासक्रमाकडे सर्वाधिक कल आहे?

ल्ल महिला प्रशिक्षणार्थ्यांचा सर्वाधिक कल गार्मेंट, फॅशन डिझायनिंग तसेच ब्युटी थेरपी अ‍ॅण्ड हेअर ड्रेसिंग या क्षेत्राकडे तर पुरुष प्रशिक्षणार्थ्यांचा सर्वाधिक कल हा इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, बँकिंग या क्षेत्राकडे आहे.