अनिल परबांच्या आवाहनानंतर राज्यात १९ हजार एसटी कर्मचारी कामावर परतले!

कामावर येणाऱ्यांना पोलीस संरक्षण ; बसेसची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच महाविद्याल व शाळकरी विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मंत्र्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे १९ हजार कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाले. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी २५० आगारांपैकी १०५ आगारातून वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, रविवारी ७३४ बसेसद्वारे सुमारे १७०३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ लाख ०४ हजार ८०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या वाहतूकीतून महामंडळाच्या तिजोरीत ७६ लाख ३० हजार रूपयांची भर पडली आहे.

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून गेल्या एक महिन्याहून अधिक काळ संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी शुक्रवारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनता एसटीची आतुरतेने वाट पाहत आहे. शाळा महाविद्यालयात जाणारे लाखो विद्यार्थी – विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे शेतकरी, शेतमजूर अशा अनेक गोरगरीब प्रवाशी जनतेची एसटीअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी कामगारांनी कामावर यावे, असे आवाहन केले होते. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, परंतु त्यांची कोणी अडवणूक करत असेल अशा लोकांवर कठोर कारवाई करणार असा इशारा देत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देणार असल्याचेही मंत्री परब यांनी घोषित केले होते. परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. तसेच, जे कर्मचारी कामावर रूजू होत आहेत, त्यांना पोलीस संरक्षणही दिले जात आहे.

अनिल परब यांच्या आवाहनानंतर रविवारी अनेक कर्मचारी कामावर परतले. तर सोमवारी या संख्येत वाढ होऊन उपस्थितांची संख्या १९ हजारांपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे अनिल परब यांच्या आवाहनानंतर शनिवार, ३ डिसेंबर रोजी अवघी ४९ आगारे सुरु होती. अवघ्या तीन दिवसानंतर ५६ आगारांची भर पडून सोमवारी राज्यभरातील १०५ आगारे सुरु झाली आहेत. राज्यभरात संपाच्या पार्श्वभूमीवर आगारातून एसटी वाहतूक करताना आतापर्यंत ४० पेक्षा अधिक बसेस फोडण्यात आल्या आहेत. एसटीच्या आवारात बसेस अडवणे, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, गेट बंद करणे आदी घटनांवरून ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहतुकीला विरोध करणाऱ्या १४ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा –

दरम्यान, लातूर आगारातून बाहेर पडणाऱ्या एसटीला प्रतिबंध करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई करत चांगलाच दणका दिला आहे. वाहतुकीला विरोध करणाऱ्या १४ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर धारूर येथेही संपकरी कर्मचाऱ्यांनी आगारातून बाहेर पडणारी बस अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे आगारातून बस वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महामंडळ प्रशासनाच्यावतीने संरक्षण दिले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 19000 st employees return to work in the state after anil parbas appeal msr

ताज्या बातम्या