राज्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. तब्बल २३ हजार ३५० नव्या करोनाबाधितांची आज नोंद झाली. तर ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ७ हजार २१२ वर पोहचली. तर, ७ हजार ८२६ जणांनी आज करोनावर मात केली आहे.

राज्यातील एकूण ९ लाख ७ हजार २१२ करोनाबाधितांमध्ये डिस्चार्ज मिळालेले ६ लाख ४४ हजार ४०० जण, २ लाख ३५ हजार ८५७ अक्टिव्ह रुग्ण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २६ हजार ६०४ जणांचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

मुंबईत आज १ हजार ९१० नवे करोना रुग्ण आढळले, तर ३७ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर आज ९११ जण करोनामुक्त झाले. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ५५ हजार ६२२ वर पोहचली. ज्यामध्ये २३ हजार ९३० अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले १ लाख २३ हजार ४७८ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ७ हजार ८६६ जणांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या हवाल्याने याबाबत वृत्त देण्यात आले आहे.