अडीच कोटींची अपसंपदा; दोघा अभियंत्यांना अटक

बनावट काम दाखवून तत्कालीन उपविभागीय अभियंता भास्कर काशीनाथ जाधव व शाखा अभियंता श्रीनिवास बालाजी काळे यांनी कोटय़वधींची अपसंपदा कमावली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

लघु पाटबंधारे विभागात कार्यरत असताना पाझर तलावांचे बनावट काम दाखवून तत्कालीन उपविभागीय अभियंता भास्कर काशीनाथ जाधव व शाखा अभियंता श्रीनिवास बालाजी काळे यांनी कोटय़वधींची अपसंपदा कमावली. या प्रकरणी सोमवारी या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या जवळच्या नात्यातील व्यक्तींवरही गुन्हे दाखल करण्यात आले.
जाफराबाद तालुक्यात काम करताना पापळ तालुक्यातील तलाव क्रमांक आठमध्ये मोजमाप पुस्तिकेत खोटय़ा नोंदी करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात पाझर तलावाचे काम न करताच जाधव याने कंत्राटदारास ९ लाख ६५ हजार ५७३ रुपयांचे देयक दिले. या बाबत गुन्हा दाखल झाल्यावर घराची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे १ कोटी ९२ लाख ३८ हजार रुपयांची अपसंपदा आढळून आली. त्याच्या वैध कमाईपेक्षा ही रक्कम ३०९ टक्के अधिक असल्याचा ठपका ठेवत लाचलुचपत पथकाने जाधव यास अटक केली. या प्रकरणी जाधवची पत्नी अरुणा व मुलगा मकरंद याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली. त्या आधारे जाधव यास अटक करण्यात आली.
जालना येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असताना श्रीनिवास बालाजी काळे याने बरेच घोटाळे केले. लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत ५ तलावांचे काम न करताच मोजमाप पुस्तिकेत ते नोंदविण्यात आल्याचे आढळून आले. कंत्राटदाराला चार लाख ६१ हजार ४७८ रुपये अदा केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. उत्पन्नापेक्षा ८७.७८ टक्के अपसंपदा आढळून आल्याने काळे यास अटक करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 2 5 crore unauthorized property two engineer arrest

ताज्या बातम्या