नगर शहरातील युवक-युवती ठार

नगर ते पुणे रस्त्यावर आज, शनिवारी दुपारी विचित्र पद्धतीने झालेल्या अपघातात नगर शहरातील कॉलेज युवक व युवती असे दोघे ठार झाले.

नगर ते पुणे रस्त्यावर आज, शनिवारी दुपारी विचित्र पद्धतीने झालेल्या अपघातात नगर शहरातील कॉलेज युवक व युवती असे दोघे ठार झाले. शिवकिरण ज्ञानेश्वर खांडरे (वय २५) व कोमल संजय जगदाळे (वय २१, दोघेही रा. वंजार गल्ली, नगर) अशी दोघांची नावे आहेत. शिवकिरण हा माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचा मुलगा आहे.
अपघात चास शिवारातील वाघ वस्तीजवळ दुपारी एकच्या सुमारास झाला. शिवकिरण व कोमल हे दोघेही पुणे रस्त्यावरील चास येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दुस-या वर्षांला शिकत होते. दोघेही वंजार गल्लीत शेजारी राहात असल्याने बरोबरच कॉलेजला जात होते. नगर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी कॉलेजमध्ये गेल्यावर दोघेही दुपारी, मधल्या सुटीत जेवणासाठी बाहेर गेले. या मोटारसायकलला क्रमांक नव्हता.
अपघात झाला तेथे वळणाचा रस्ता आहे. जेवण आटोपून परत कॉलेजमध्ये येत असताना मोटारसायकल वळणाच्या ठिकाणी रस्त्याच्या दुभाजकला धडकली व दोघेही दुभाजकाच्या पलीकडे, रस्त्याच्या दुस-या बाजूला फेकले गेले. त्याच वेळी नगरहून पुण्याकडे एसटी बस जात होती. दोघेही या बसच्या चाकाखाली सापडले. मोटारसायकल दुभाजकावर पडलेली होती. परिसरातील नागरिकांनी लगेच रुग्णवाहिकेतून दोघांना नगरच्या सरकारी रुग्णालयात पाठवले, मात्र रस्त्यातच दोघांचे निधन झाले. या घटनेमुळे कॉलेजमध्ये व वंजार गल्लीतही शोककळा पसरली. घटनास्थळीही काही वेळ वाहतूक खोळंबली होती. अधिक तपास सहायक निरीक्षक नरवडे करत आहेत.
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 2 college students killed in accident in nagar

ताज्या बातम्या