scorecardresearch

पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाला अपघात; दोन ठार, सहा जण गंभीर जखमी

पोलीस कर्मचारी असलेले अनिल पारखी हे चंद्रपूरला मोठय़ा भावाच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला आले होते.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

चंद्रपूर : पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आटोपून पारखी कुटुंबीय चंद्रपूरहून चार्मोशीला जात असताना चिचपल्ली जवळ चारचाकी वाहन उलटून भीषण अपघात झाला. यात पारखी कुटुंबातील सासू व सुनेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस कर्मचारी असलेले अनिल पारखी हे चंद्रपूरला मोठय़ा भावाच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला आले होते. गुरुवारी रात्री पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पारखी कुटुंबीय चार्मोशीला जाण्यास निघाले. चिचपल्लीजवळ वाटेत जनावर आडवे आल्याने चालकाने करकचून ब्रेक दाबला असता, वाहन उलटून बाजूलाच असलेल्या छोटय़ा नाल्यात पडले. हा अपघात इतका भीषण होता की, चारचाकी वाहनांचा चेंदामेंदा झाला होता. यामध्ये पोलीस कर्मचारी अनिल पारखी यांची पत्नी किरण पारखी (३२), शोभा पारखी (६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अनिल पारखी (४०), साधना पारखी (४५), राम पारखी (७), आराध्या पारखी (४), ओम (१०) व नंदिनी (१४) हे सहा जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती होताच चिचपल्ली येथील काही नागरिकांनी सर्वाना बाहेर काढत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातात एकाच कुंटुंबातील सासू व सुनेचा मृत्यू व सहा जण गंभीर जखमी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघात झाला असताना काही संधीसाधून चक्क पारखी कुंटुंबाचे सोन्यांचे दागिने लंपास केल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2 killed six injured in police car accident zws

ताज्या बातम्या