तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या गोदावरी नदीवरील हिंगणी बंधाऱ्यात पोहण्यास गेलेल्या चारपकी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली. मृत विद्यार्थ्यांत सार्थक किशोर सोनवणे (वय १७) रा. निवारा  व सार्थक (साईनाथ) संतोष लांडे (वय १७) रा. लक्ष्मीनगर कोपरगाव या दोघांचा समावेश आहे. तर वाचलेल्यात हृषीकेश अंकुश आगलावे व अक्षय नामदेव चौधरी या दोघांचा समावेश आहे.

या बाबत ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी ,सार्थक सोनवणे ,साई लांडे ,ऋषिकेश आगलावे ,अक्षय चौधरी हे चौघे मित्र सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालायात बारावी कॉमर्स विभागात शिक्षण घेत आहेत. हे चौघे आज महाविद्यालयाला न जाता पोहण्यासाठी हिंगणी बंधारा येथे गेले.तेथे असलेल्या राघोबादादा वाडय़ाच्या बाजूने ते पोहण्यासाठी उतरले .मात्र पोहता येत नसल्याने सार्थक सोनवणे व साई लांडे हे चिखलात पाय रुतल्याने बुडून मयत झाले तर ऋषिकेश अंकुश आगलावे व अक्षय नामदेव चौधरी हे कसेबसे काठावर आल्याने ते दुर्घटनेतून वाचले. सदरची घटना कळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ बच्छे ,अर्जुन बाबर हे घटनास्थळी पोहचले त्यांनी हिंगनीच्या राजेंद्र लक्ष्मन चंदनशिव यांच्या मदतीने दोघा मयत विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणले. हि घटना कळताच गोदावरी नदी व  हिंगणी तसेच ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. यातील साईनाथ लांडे हा लक्ष्मिनगर येथे त्याच्या मामाकडे शिकण्यास होता. तो मुळचा माहुली, ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथील आहे. मयतांच्या नातेवाईकाना हि घटना कळताच त्यांनी एकच टाहो फोडला. सार्थक सोनवणे याच्या वडिलांचे शहरातील निवारा भागात केशकर्तनालयाचे दुकान त्यांना हि घटना समजताच  मानसिक धक्का बसला. या बाबत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मित्र सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालायाचे प्राचार्य किशोर काकडे यांनी मयत व वाचलेले चारही विद्यार्थी बारावी कॉमर्स मध्ये शिकत होते .मयत विद्यार्थाना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.मयत ,सार्थक सोनवणे ,साई लांडे यांचे शवविच्छेदना नंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या काही आठवडे  अगोदर गोदावरी नदी पात्रात पाणी आल्या नंतर एकाने नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली तर एका महिलेने शहरातील मोठय़ा पुलावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडल्या होत्या .चार पाच वर्षांपूवी शहरातील शिवाजी रस्ता भागातील चार तरुण विद्यार्थी पोहण्यास गेले होते ते हि त्यावेळी मयत झाले होते. मात्र आज पुन्हा दोन जण गेल्याने या घटनेने पुन्हा तालुका हादरून गेला आहे.