मुंबई : नागपूरमध्ये २० रुग्णांना ओमायक्रॉनचा उपप्रकार ‘बीए.२.७५’ ची बाधा झाल्याचे गुरुवारी आढळले. पुण्यामध्ये याच उपप्रकारची बाधा झाल्याचे दहा रुग्ण बुधवारी आढळले होते. राज्यातील या प्रकारच्या रुग्णांची संख्या आता ३० झाली.

नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) जनुकीय अहवालात २० जणांना  ‘बीए.२.७५’ची लागण झाल्याचे आढळले आहे. यामध्ये ११ पुरुष आणि नऊ स्त्रियांचा समावेश असून या रुग्णांना १५ ते ५ जुलै या काळात करोनाची बाधा झाली होती. यामध्ये सर्वाधिक म्हणजे नऊ रुग्ण हे १९ ते २५ वयोगटातील तर २६ ते ५० वयोगटातील सहा, ५० वर्षांवरील चार आणि १८ वर्षांखालील एका रुग्णाचा समावेश आहे. रुग्णांमधील १७ जणांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. तसेच हे सर्व रुग्ण लक्षणविरहित किंवा सौम्य स्वरूपाचे असून ते आजारातून बरे झाले आहेत.

रुग्णसंख्या तीन हजारांच्या खाली

राज्यात दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आता तीन हजारांपेक्षा कमी आहे. गुरुवारी २ हजार ६७८ रुग्ण नव्याने आढळले. तर ३ हजार २३८ रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातील मृतांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबई आणि औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन, तर वसई-विरार, रायगड, पुणे, सोलापूरमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली.

ठाणे जिल्ह्यात २६७ नवे बाधित

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी २६७ नवे करोना रुग्ण आढळून आले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आढळलेल्या २६७ रुग्णांपैकी नवी मुंबई ९५, ठाणे ८५, कल्याण – डोंबिवली ४३, मीरा भाईंदर २३, ठाणे ग्रामीण १३, भिवंडी चार, उल्हासनगर आणि बदलापूर पालिका क्षेत्रात प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई पालिका क्षेत्रात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.