केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती; मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण वेगात
कोकणच्या तीनही जिल्ह्य़ांतून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबरोबरच अन्य जिल्हा व राज्यस्तरावरील रस्ते विकासासाठी मिळून एकूण सुमारे २० हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचे भूमीपूजन गडकरी यांच्या हस्ते निवळी येथे झाले. या वेळी ते म्हणाले की, सुमारे दोन महिन्यात हे संपूर्ण चौपदरीकरण पूर्ण होऊन १ मे २०१८ रोजी चौपदरीकरणाचे उद्घाटन होईल असा विश्वास आहे. या व्यतिरिक्त रत्नागिरी-कोल्हापूर राज्य महामार्गाचे (१३७ किलोमीटर) चौपदरीकरण, गुहागर-चिपळूण-पाटण-कराड (७१ किलोमीटर) मार्ग, निवळी-जयगड मार्ग, अलिबाग-वडखळ, इंदापूर-दिघी, पोलादपूर-महाबळेश्वर, नांदगाव-देवगड, कुडाळ-सिंधुदुर्ग व मालवण आणि कणकवली-आचरा या सर्व मार्गासाठी मिळून आणखी १० हजार कोटी रूपये, अशी एकूण २० हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर कोकणच्या किनारपट्टीवरील सागरी महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेत समावेश करण्याचीही घोषणा गडकरी यांनी केली. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मालकांना घसघशीत मोबदला देण्याची मागणी केली. तो धागा पकडून गडकरी म्हणाले की, या शेतकऱ्यांना ४० लाख ते १ कोटी रूपयांपर्यंत मोबदला देण्यात येणार असून देशातील भरपाईचा हा नवा उच्चांक आहे.
जयगड येथे मेरी टाइम विद्यापीठ स्थापण्याचीही घोषणा गडकरी यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील पर्यटन वाढीची गरज मांडली.
सेनेऐवजी राणेंशी जवळीक
या चौपदरीकरणासाठी नारायण राणे यांनी पाठपुरावा केल्याचे कारण देत स्वत: गडकरी यांनी पुढाकार घेऊन त्यांना कार्यक्रमाला निमंत्रित केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राणेंनीही संधीचा पुरेपूर फायदा उठवत राज्य सरकार, विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यपध्दतीवर टीकेची झोड उठवली. शिवसेनेला श्रेय न देण्याच्या डावपेचातून ही योजना झाली असावी असा अंदाज आहे.