कोपरगाव तालुक्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ३.७ इंच (८२ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीपात्रात २० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत हे पाणी कोपरगावला पोहोचेल.
कोपरगाव तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. मधूनच वेग कमी-जास्त होत होता, मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत संततधार सुरूच होती. या २४ तासात तालुक्यात तब्बल ८२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील हवामान केंद्रात झाली आहे. या पावसाने शेतकरी सुखावले असून दुष्काळाचे सावट ब-यापैकी शिथिल होईल, असा अंदाज व्यक्त होतो.
दरम्यान, नाशिक जिल्ह्य़ातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने तेथील दारणा, गंगापूर आदी धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. पाण्याची पातळी संतुलित राखण्यासाठी या धरणांमधून पाणी सोडण्यात आले असून नांदूर मध्यमेश्वर येथील बंधा-यातून गोदावरी नदीपात्रात २० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी पहाटेपर्यंतच हे पाणी कोपरगावला पोहचून गोदावरी पुन्हा वाहती होईल.
संग्रहित लेख, दिनांक 19th Sep 2015 रोजी प्रकाशित
नाशिकच्या पावसाने गोदावरी वाहती
त्र्यंबकेश्वर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीपात्रात २० हजार क्युसेकने पाणी सोडले.
Written by अपर्णा देगावकर

First published on: 19-09-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 thousand cusec water release in godavari river from nashik dam