आखातातील युद्धाचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला असून राज्यातील ४० टक्के हॉटेल बंद झाल्याचे वृत्त आहे. तसेच उर्वरित हॉटेल्स आणि छोटे-मोठे खाद्या स्टॉल्सही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कोळशाची शेडगी आणि विद्यूत इंडक्शनचा वापर पर्याय म्हणून केला जात असला तरीही तो कायमस्वरुपी उपाय नसून खर्चिक उपाय आहे. त्यामुळे हॉटेलचालक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, अहिल्यानगर येथील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने त्यांना २० वर्षांपूर्वी लग्नात मिळालेल्या स्टोव्हचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. टीव्ही ९ मराठीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अहिल्यानगर येथील नाश्ता सेंटरचालक महेंद्र यांना सिलिंडर तुटवड्याचा फटका बसला आहे. व्यावसायिकसह घरगुती सिलिंडरही मिळताना अडचणी येत असल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे यावर शक्कल लढवत त्यांनी २० वर्षांपूर्वी लग्नात कन्यादानात मिळालेला स्टोव्ह आता वापरायला काढला आहे. या स्टोव्हसाठी लागणारा केरोसिन उपलब्ध नसल्याने त्याला पर्याय म्हणून डिझेल वापरला जात आहे.
काय म्हणाले हॉटेल व्यावसायिक?
सिलिंडर टंचाईवर महेंद्र म्हणाले, मला गॅस सिलिंडरची खूप टंचाई जाणवत होती. कमर्शिअल गॅसही दिले जात नाहीयत. पण २० वर्षांपूर्वी मिळालेला स्टोव्ह आता कामाला आला. मी स्टोव्हमध्ये पर्याय म्हणून डिझेल भरतो आहे. एखादी बॉटल भरून आणायची. ती बॉटल संपली की दुसरी बॉटल भरायची.”
“मी गेल्या २० वर्षांपासून हा व्यवसाय करतोय. लग्नात मुलीला कन्यादान म्हणून माझ्या पत्नीच्या काकांनी हा स्टोव्ह भेट म्हणून दिला होता”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
राज्यात एलपीजी तुटवड्याचं मोठं संकट
दरम्यान, राज्यात सुमारे पाच लाख हॉटेल्स असून त्यातील २० हजार मुंबईत आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक कामगार आता पुन्हा गावाकडे परतले आहेत. आकाती युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसांतच एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झआला आणि त्याचा पहिला फटका व्यावसायिकांना बसला आहे.
केंद्र सरकारने ७ मार्चला काढलेल्या परिपत्रकानुसार, सरकारने घरगुती गॅस सिलिंडर वितरणाला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. तसंच, रुग्णालय, शाळा, वसतिगृहांना गॅस वितरणाचा निर्णय घेण्यात आला.
