अकोला : जिल्ह्यात गोवंशीय व म्हैसवर्गीय जनावरांमधील ‘लम्पी’ या त्वचारोगाचा जिल्ह्यात उद्रेक झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल १४७६ जनावरे बाधित झाली असून त्यापैकी ४६ जनावरे दगावली आहेत. या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी अबाधित जनावरांना देण्यात येणाऱ्या लसीच्या दोन लाख ८८ हजार मात्रा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या. आतापर्यंत ८७ हजार ५८४ जनावरांना लसीकरण करण्यात आले असून उर्वरित जनावरांचे लसीकरण वेगात करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

‘लम्पी’ त्वचारोग या प्राण्यांमधील आजाराचा जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीला विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जी.एम. दळवी डॉ. बाळकृष्ण धुळे, डॉ. देशमुख, डॉ. सोनवणे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात ज्या गावांत ‘लम्पी’ त्वचारोग बाधित जनावरे आढळलेल्या गावांतील जनावरांची संख्या ४७ हजार २६४ आहे. प्रत्यक्षात बाधित जनावरे १४७६ आहेत. बाधित जनावरे आढळलेल्या गावांच्या पाच किमी त्रिज्येच्या परिसरात ३४३ गावे आहेत. याच पाच किमी त्रिज्या परिसरात येणाऱ्या जनावरांची संख्या एक लाख १३ हजार ३९८ आहे. त्यापैकी ८७ हजार ५८४ जनावरांचे लसीकरण झाले. बाधित जनावरांपैकी ४२९ जनावरे उपचारांनंतर बरी झाली. सद्यस्थितीत १००१ सक्रिय पशुरुग्ण आहेत.

दगावलेल्या जनावरांच्या मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासंदर्भात शासनाच्या निर्देशांचे पालन व्हावे. ही विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीनेच लावण्यात यावी. जिल्ह्यात जी जनावरे दगावली त्या पशुपालकांना द्यावयाच्या मदतीबाबत तात्काळ उपाययोजना कराव्या. दुधाच्या सेवनाबाबत जनतेच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करावी. जनावरांचे मृत्यूचे प्रमाण खाली आणण्यासाठी प्रयत्न करावे. शहरी भागातील जनावरांच्या लसीकरणालाही गती द्यावी, अशा सूचना मिटकरी यांनी केल्या.

९९ खासगी पशुवैद्यकांची मदत

लसीकरणाच्या मात्रा पूर्ण प्राप्त झाल्याने लसीकरणाची गती वाढवावी, यासाठी ९९ खासगी पशुवैद्यक व अन्य मनुष्यबळाची उपलब्धता केली आहे. लवकरच लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आजारी जनावरांना तात्काळ उपचार उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.