राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिका-यांनी आपले एक दिवसाचे वेतन सरकारला देण्याचे स्वत:हून जाहीर केले आहे. ही रक्कम सुमारे २०० कोटी रुपये होते.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगिराज खोंडे यांनी ही माहिती दिली. संघटनेने यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनाही निवेदन पाठवून ही माहिती दिली आहे व मासिक वेतनातून एक दिवसाचे वेतन कापून घ्यावे, असे सुचवले आहे. संघटनेने सेवानिवृत्तांनीही आपले एक दिवसाचे वेतन द्यावे असे आवाहन केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातच अवकाळी पाऊस व गारपिटीने जनतेचे, शेतक-यांचे अभूतपूर्व असे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले, अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले, दुभत्या जनावरांची अपरिमित हानी झाली, शेती उद्ध्वस्त झाली. त्यासाठी संघटनेने ही मदत दिली आहे.