पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २१२ करोना रुग्ण आढळल्याने, एकूण रुग्ण संख्या १२  हजार ६८६ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ५१८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

तर, करोनावर उपचार घेणार्‍या २५५ रुग्णांची तब्येत ठणठणीत झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर ७  हजार ६७२ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज नव्याने ९८ करोनाबाधित रुग्ण आढळले असून चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या १  हजार ८६३ वर पोहचली असून आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत ५७ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर आजतागायत अकराशेहून अधिक जण करोनामुक्त झालेले आहेत.

नवी मुंबईत १२० नवे रुग्ण, चौघांचा मृत्यू –

नवी  मुंबईत  करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना, मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत.आज १२० नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची संख्या ४ हजार ९६१ झाली आहे. तर  शहरात आज  ४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १६८ झाली आहे. शहरातील ४ हजार ९६१ रुग्णांपैकी २ हजार  ८५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.